रत्नागिरी:- गुजरातच्या सागरी हद्दीत विहार करणारे ‘प्रथमा’ कासवाचा महाराष्ट्राकडे परतीचा प्रवास सुरु झाला असून सावनी आणि वनश्रीही आणखी दक्षिणेकडे सरकु लागलेल्या आहेत. तिन्ही कासवांचा प्रवास पाहीला तर महासागरातील बदलत्या प्रवाहामुळे त्यांचा हा प्रवास दक्षिण दिशेने सुरु झाला असावा असे निरीक्षण संशोधकांनी नोंदवले आहे.
वनविभागाच्या कांदळवन प्रतिष्ठानमार्फत वेळास, आंजर्ले, गुहागर किनार्यांवरुन सॅटेलाइट टॅगिंग केलेल्या कासवांचा आठवडा भरातील प्रवासाची माहीती नुकतीच प्रसिध्द झाली आहे. त्यानुसार ‘प्रथमा’ कासव वेळास येथून गुजरातच्या दिशेने पुढे सरकु लागले होते. पंधरा दिवसांपुर्वी या कासवाचा मुक्काम खोल समुद्रात गुजरातच्या हद्दीत होता. चार दिवसांपुर्वी प्रथमा माघारी परतत असल्याचे दिसत आहे. ते दक्षिणेकडे महाराष्ट्राच्या किनारपट्टीकडे येत आहे. मुंबईच्या किनारपट्टीपासून ते खोल समुद्रात असल्याने ते दक्षिणेकडे कुठवर जाणार हे आताच सांगणे कठीण आहे. टॅग केलेल्या अन्य तिनपैकी सावनी आणि वनश्री ही दोन्ही कासवं आणखी दक्षिणेकडे सरकत आहेत. तिन्ही कासवांचा प्रवासाची दिशा एकच आहे. खोल समुद्रातील प्रवाह बदलत असल्यामुळे त्या कासवांचा प्रवास दक्षिणेकडे सुरु झाला असावा असा अंदाज आहे.
रेवा हे कासव किनार्यापासून दूर पश्चिमेकडे जात असून सध्या कर्नाटकच्या किनारपट्टीपासून २४० किमी अंतरावर आहे. रेवा अलीकडच्या काळात सरासरी १५० मीटर खोलीपर्यंत डुबकी मारत आहे. ते चागोस रिज किंवा तेथील पठारावर खाद्याच्या शोधात आहे. मॅग्रुव्ह फाऊडेंशन ट्वीटरवरुन ही सर्व माहिती सादर केली आहे.