‘प्रथमा’चा प्रवास आता वेंगुर्लेच्या वायंगणी समुद्र किनारपट्टीच्या दिशेने

रत्नागिरी:-गुजरातच्या सागरी हद्दीत विहार करणारे ‘प्रथमा’ कासवाचा महाराष्ट्राकडे परतीचा प्रवास सुरु झाला आणि त्यानंतर ‘प्रथमा’  वेळास समुद्रकिनारी परतली होती. मात्र, आता ती आणखी दक्षिणकडे गेली असून, वेंगुर्ले येथील वायंगणी समुद्रकिनारी दिसून येत आहे. सावनी आणि रेवा आता एकत्र असून, वनश्री पूर्वीच्याच म्हणजे कॉन्टिनेंटल शेल्फच्या परिसरात मार्गक्रमण करत आहेत.

तिन्ही कासवांचा प्रवास पाहीला तर महासागरातील बदलत्या प्रवाहामुळे त्यांचा हा प्रवास दक्षिण दिशेने सुरु झाला असावा असे निरीक्षण संशोधकांनी यापूर्वी नोंदवले आहे.

वनविभागाच्या कांदळवन प्रतिष्ठानमार्फत वेळास, आंजर्ले, गुहागर किनार्‍यांवरुन सॅटेलाइट टॅगिंग केलेल्या कासवांचा आठवडा भरातील प्रवासाची माहीती नुकतीच प्रसिध्द झाली आहे.

त्यानुसार ‘प्रथमा’ कासव वेळास येथून गुजरातच्या दिशेने पुढे सरकु लागले होते. त्यानंतर या कासवाचा मुक्काम खोल समुद्रात गुजरातच्या हद्दीत होता. दरम्यान, प्रथमा माघारी परतत असल्याचे दिसत आहे. ती दक्षिणेकडे महाराष्ट्राच्या किनारपट्टीकडे आली.  याआधी ती वेळास समुद्रकिनारी आली आणि सुमारे ८० किमी ऑफशोअरमध्ये दिसून येत होती. आता ती पुन्हा दक्षिणकडे गेली असून, वेंगुर्ले येथील वायंगणी समुद्रकिनाऱ्यासमोर सुमारे 35 किमी ऑफशोअरमध्ये दिसून येत आहे.

रेवा उत्तरेकडे वळली आहे तरीही ती कॉन्टिनेंटल शेल्फच्या काठावर २५० किमी ऑफशोअरवर राहिली आहे. आता सावनीदेखील तिच्यात सामील झाली आहे.  वनश्रीनेही पुढे पाऊल टाकले आहे पण ती कॉन्टिनेंटल शेल्फमध्येच राहिली आहे. सद्य ती त्याचठिकाणी दिसून येत आहे.