प्रतिक्षा संपुष्टात… गणपतीपुळेत आजपासून दर्शनाची पर्वणी

रत्नागिरी:- राज्य शासनाच्या आदेशानंतर जिल्ह्यातील मंदिरे सोमवारपासून (ता. 16) भक्तांना दर्शनासाठी खुली होणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गणपतीपुळे मंदिर व्यवस्थापनाने सकाळी दोन तास स्थानिकांना दर्शनासाठी राखीव ठेवले आहे. गर्दी टाळण्यासाठी रांगेतील दोघांमध्ये पाच फुटाचे अंतर ठेवण्याकडे कटाक्ष राहील. जागोजागी हात धुण्याची व्यवस्था केली असून मास्क अत्यावश्यक आहे. व्हीव्हीआयपींसह खासगी व्यक्तींना मागील दरवाजाने दर्शन न देण्याचे कडक पाऊल मंदिर प्रशासनाने उचलले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्यानंतर दिवाळीच्या मुहूर्तावर पर्यटनाला सुरवात झाली आहे. गणपतीपुळेमध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये 800 ते 1000 पर्यटक किनार्‍यावर दाखल झाले होते. त्यातील कुणी मंदिराच्या कळसाचे तर कुणी बंद दरवाज्याच्या समोर उभे राहून प्रार्थनेवर समाधान मानत परतत होते. दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीत जिल्ह्यातील सर्वच पर्यटनस्थळांवर गर्दी असते. यंदा कोरोनामुळे परिस्थिती पूर्णतः बिघडलेली होती. हळूहळू त्यामधून परिस्थिती सावरु लागली आहे. गणपतीपुळे प्रसिध्द धार्मिक पर्यटनस्थळ असल्याने श्री गणपतीच्या दर्शनासाठी पर्यटक येत असतात. राज्य शासनाने मंदिरे सुरु करण्याचा निर्णय घेतला आणि पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गणपतीपुळे मंदिर व्यवस्थापनाकडून दर्शनासाठी येणार्‍या भक्तगणांच्या सुरक्षिततेसाठी काळजी घेण्यास सुरवात केली आहे. स्थानिक ग्रामस्थांसाठी सकाळी मंदिर उघडल्यानंतर दोन तास दर्शनासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. अन्य जिल्ह्यातून आलेल्या पर्यटकांसाठी दिवसभर वेळ ठेवला जाईल. चार तासानंतर दुपारी स्वच्छतेसाठी मंदिर बंद राहील. मंदिरात गर्दी होणार नाही हे लक्षात घेऊन पाच फुटाचे अंतर, मंदिर परिसरात सॅनिटायझरची व्यवस्था, हातपाय धुण्यासाठी जागोजागी नळ, मंदिरात येणार्‍या प्रत्येक पर्यटकाचे तापमान आणि ऑक्सीजन तपासणी केली जाईल. मास्क घातल्याशिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. मंदिराच्या आतील स्टॉल किंवा अन्य भाग प्लास्टीकने झाकला जाणार असून पर्यटकांचा कर्मचार्‍यांशी संपर्क येणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. शासनाकडून निकष आले नसले तरीही मंदिर व्यवस्थापनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक पावले उचलली आहे.

गणपतीपुळेतील देव गाभार्‍यात असल्यामुळे एकावेळी एकाच व्यक्तीला दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे मोसमात गर्दी प्रचंड होऊ शकते. दिवसभरात कमी लोकांना दर्शन मिळणार आहे. अनेकवेळा लोकप्रतिनिधी, अधिकारी यासह महत्त्वाच्या पदावर काम करणार्‍या व्यक्ती गर्दी टाळण्यासाठी देवस्थान प्रशासनाकडून दर्शनासाठी प्रयत्न करतात. सध्याच्या परिस्थितीत अशा व्यक्तींसाठीची व्यवस्था न करण्याचा निर्णय देवस्थानने घेतला आहे.

मंदिर सोमवारी दर्शनासाठी खुले केले जाणार आहे. भक्तगणांसाठी निकष निश्‍चित केले असून गोंधळ होऊ नये म्हणून देवस्थानकडून विशेष काळजी घेतली गेली आहे. कोरोनामुळे गर्दी होऊ नये यासाठी भक्तगणांनाही आवाहन केले आहे. डॉ. विवेक भिडे, सरपंच, देवस्थान