रत्नागिरी:- जल जीवन मिशन या अभियानातंर्गत ग्रामीण भागातील कुटुंबांना पुरेसे, दर्जेदार व नियमित पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मार्च २०२४ अखेर पर्यंत संपुर्ण जिल्हा हर घर नल से जल म्हणून घोषित करण्याचे उद्दीष्ट राज्याने ठेवले आहे. त्यासाठी प्रजासत्ताक दिनी (ता. २६) आयोजित ग्रामसभेत जल जीवन मिशनच्या कामांचे वाचन आणि त्यावर चर्चा केली जाणार आहे.
जल जीवन मिशन अभियानात लोकसहभाग व पारदर्शकता मिळवून देण्यासाठी विविधस्तरावर व्यापक प्रचार, प्रसिध्दी देणे आवश्यक असल्याने ग्रामसभेत ग्रामपंचायत सदस्यांसोबत ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीच्या सदस्यांना आमंत्रित करुन विशेष स्थान देण्यात यावे. समिती सदस्यांची ओळख तसेच त्यांच्या अधिकार व जबाबदारीबाबत उपस्थित ग्रामस्थांना माहिती दिली जाणार आहे. पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षणांतर्गत पाणी गुणवत्ता चाचणीसाठी प्रशिक्षीत करण्यात आलेल्या पाच महिलांना सभेस आमंत्रित करुन सन्मानित करण्यात येणार आहे. त्या महिलांची संपर्क क्रमांकासहीत नावे गावातील सार्वजनिक ठिकाणी ठळकपणे प्रसिध्द केली जातील. जेणेकरुन त्यांचा उत्साह वाढीस लागून पाणी गुणवत्ता राखण्याच्या अनुषंगाने गाव स्वयंनिर्भर होईल. ग्रामसभेेवेळी क्षेत्रिय तपासणी संचाच्या माध्यमातून महिलांद्वारे स्त्रोतांची तपासणी व नळ जोडणीव्दारे येणार्या पाण्याच्या नियमित तपासणीबाबतच्या कार्यपध्दतीची माहिती ग्रामसभेमध्ये माहिती दिली जाईल. जल जीवन मिशन अंतर्गत मंजूर योजनेची सविस्तर माहिती ग्रामसभेत दिली जाणार आहे. योजनेचे उद्दिष्ट, योजनेतील समाविष्ट उपांगे, मंजुर निविदेची रक्कम, योजनेचा कालावधी, कंत्राटदारांचे नाव, नळ जोडणीची सद्यस्थिती तसेच प्रगतीत असलेल्या व पूर्ण झालेल्या कामांची माहिती देण्यात येणार आहे. योजनेअंतर्गत गावातील पाणी पुरवठा सुविधांच्या अनुषंगाने आवश्यक जमा करावयाचा समुदायाचा वाटा, जमा झालेली रक्कम व उर्वरित जमा करावयाची रक्कम याबाबत आवश्यक कृती योजना आखण्याबाबत चर्चा घडवून आणण्यात येणार आहे. नळ पाणी पुरवठा योजना पुर्णत्वानंतर योजना शाश्वततेच्या दृष्टीने आवश्यक पाणीपट्टी वसुली तसेच योजनेची थकीत पाणीपट्टी वसुली संदर्भात विशेष चर्चा करण्यात यावी. २६ जानेवारी पूर्वी जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेची माहिती दर्शविणारे समूह माहिती फलक योजनेच्या ठिकाणी यापूर्वी प्रदर्शित केला नसल्यास, तो प्रदर्शित केला जाणार आहे. या ग्रामसभांचे आयोजन करावे असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी केले आहे.