पौष्टीक तृणधान्य प्रदर्शनातून एक लाखाची उलाढाल

नाचणीच्या पदार्थांना प्रतिसाद ; ६३ महिलांनी १८० पदार्थ बनवले

रत्नागिरी:- कृषि विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत तिन दिवसांच्या पौष्टीक तृणधान्य पदार्थ प्रदर्शनातून एक लाख रुपयांची उलाढाल झाली. यामध्ये नाचणीच्या प्रक्रिया पदार्थांसह ज्वारी, बाजरीचे पदार्थही विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. यावेळी आयोजित पाककले स्पर्धेत सहभागी झालेल्या ६३ महिलांनी १८० प्रकारचे पदार्थ प्रदर्शनात ठेवले होते.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ च्या निमित्ताने कृषि विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी शहराजवळील अंबर हॉलमध्ये जिल्हास्तरीय प्रदर्शन व कार्यशाळा घेण्यात आली. तिन दिवसीय प्रदर्शनात जिल्ह्याच्या विविध ठिकाणाहून आलेले बचत गट सहभागी होते. नाचणीची पीठ, प्रक्रिया केंलेले पदार्थ, तांदुळांपासूनचे पदार्थ, विविध प्रकारची बियाणे आदी पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. पहिल्या दिवशी पाचशे लोकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी उपस्थितांनी केलेल्या खरेदीमधून एक लाखाची उलाढाल झाली.

यानिमित्ताने  पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी साठे यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध महिला बचत गट, महिला वैयक्तिक याप्रमाणे एकूण ६३ स्पर्धकांनी सहभाग घेतला. ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, वरी, कोद्रा अशा विविध प्रकारच्या तृणधान्य पिकांपासून बनविलेले नाचणीचे लाडू, नाचणी केक, कुरडी, शंकरपाळी, ज्वारीची पोटली बिर्याणी, नाचणीचे गुलाबजाम, नाचणी इडली व डोसे, वरीचे मोदक, ढोकळा., शेवया, नाचणी सत्वाची वडी, नाचणीचे मोमोज, वरिचे अनारसे, घावणे अशा प्रकारचे १८० पदार्थांचा समावेश होता. या कार्यक्रमाच्या पारितोषीक वितरणाला सह दिवाणी न्यायाधीश तथा न्याय दंडाधिकारी एम. आर. सातव, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती कुमार पुजार आदी उपस्थित होते.