रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या शाळेत गेल्या शैक्षणिक वर्षात शालेय पोषण आहारात अंडी, केळी दिली जात होती. मात्र नवीन शैक्षणिक वर्षात अंडी, केळी वाटप करण्याचा आदेश अद्यापही प्रशासनाला आला नाही. यंदा त्याचे वाटप होणार आहे की नाही, असा प्रश्न विद्यार्थी, पालकांतून उपस्थित करण्यात येत आहे.
प्राथमिक शिक्षण विभागाच्या शालेय पोषण आहार विभागाकडून पोषण आहारात पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नोव्हेंबर 2023 ते मार्च 2024 म्हणजेच 23 आठवडे प्रत्येक मुलास आठवड्यातून एकदा अंडी व केळी देण्यात येत होती. तसेच जे विद्यार्थी अंडी खात नाहीत, त्यांना त्या हंगामात उपलब्ध असलेली फळे देण्यात येत होती. त्यासाठी शासनाकडून खास निधीची तरतूद करण्यात आली होती. जिल्ह्यात पहिली ते आठवीच्या 1 लाख विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्यात येतो.
गतवर्षी सर्वच शाळांमधून अंड्याचे वाटप करण्यात आले नव्हते. सन 2024-25 हे नवे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन महिन्याचा
कालावधी लोटला आहे, तरीही शासनाकडून अंडी, केळी वाटपाचा आदेश आला नाही. त्यामुळे पालकांमध्ये विद्यार्थ्यासह संभ्रमावस्था आहे. यंदा अंडी, केळीचे वाटप होणार आहे
की नाही, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
यावर्षीच्या पोषण आहाराची पाककृती पुढील पुरवठ्यापासून सुरू होणार आहे. त्यामध्ये मुलांना 12 दिवसांतून एकदा अंडा पुलाव देण्यात येणार आहे. त्याची अंमलबजावणी लवकरच सुरू होणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.