पोषण आहाराचे धान्य तपासून घेणारी यंत्रणाच नाही

रत्नागिरी:- एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत अंगणवाडीतील मुलांना पुरवण्यात येणारे धान्य निकृष्ट असल्याचे भाजप युवा मोर्चाच्या प्रतिनिधींनी उघड केले; मात्र हे धान्य भरताना तपासून घेण्यासाठी यंत्रणाच नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पॅकिंग केलेले धान्य संबंधित अंगणवाडीतील सेविकांना तपासून घ्यावे लागते. याला एकात्मिक बालविकासच्या अधिकार्‍यांनीच दुजोरा दिला आहे.

शहराजवळील मिरजोळे एमआयडीसीतील एका खासगी गोडावूनमध्ये अंगणवाडींना धान्य पुरवण्यासाठीचे पॅकिंग केले जात होते. त्या धान्याचा दर्जा खराब असल्याची माहिती मिळाल्यानंतर माजी खासदार निलेश राणेंच्या नेतृत्त्वाखाली भाजयुमोचे अनिकेत पटवर्धन, नंदू चव्हाण आणि अन्य कार्यकर्त्यांनी गोडावूनवर धडक दिली. त्यांच्या हल्लाबोलमुळे सर्वच प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. जिल्ह्यातील 2871 अंगणवाडीतील 83 हजार मुलांना हे धान्य पुरवण्यात येते. त्याचबरोबर गरोदर महिलांची संख्या वेगळीच आहे. धान्य पुरवण्याचे अधिकार मार्केट फेडरेशनला दिले आहेत. त्यांच्यामार्फत ठेकेदार नियुक्ती केली जात असल्याचे एकात्मिक बालविकासकडून सांगण्यात आली; मात्र आलेले धान्य व्यवस्थित पॅकिंग होते किंवा नाही, त्याचा दर्जा काय आहे याची तपासणी गोडावूनमध्ये केली जात नाही. अंगणवाडीमध्ये धान्य पोचले की त्यातील पॅकिंग फोडून त्याची पाहणी करावयाची असते. ते खराब असले तर माघारी पाठवायचे अशा सुचना दिलेल्या आहेत. काही टन धान्य वितरीत केले जात असताना त्याच्या तपासणीची यंत्रण जिल्हास्तरावर नसल्याची धक्कादायक गोष्ट या निमित्ताने पुढे आली आहे.

जिल्ह्यातील अनेक अंगणवाड्यांमधून धान्याचा दर्जा खराब असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. त्याची तात्पुरती दखल घेतली जाते. त्यानंतर पुढे ये रे माझ्या मागल्या अशीच स्थिती होते. एमआयडीसीतील त्या गोडावूनमधील धान्य अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी केले जाणार आहे. धान्याचे नमुने घेऊन स्वतः अधिकारी पुण्याला रवाना झाले आहेत. त्यामुळे येत्या आठवडा भरात त्यावर निर्णय येईल अशी अपेक्षा आहे. एकात्मिक बालविकास कार्यालयाकडून त्या गोडावूनला टाळे मारले असून अन्न व औषध प्रशासनाचा अहवाल येईपर्यंत गोडावून त्यांच्या ताब्यात राहणार असल्याचे एकात्मिक बालविकास अधिकारी आर. बी काटकर यांनी सांगितले.

संबंधित ठेकेदाराकडून यापुर्वी पुरवण्यात आलेल्या धान्याचा दर्जा कसा आहे, याची तपासणी करुन घ्यावी असे पत्र एकात्मिक बालविकास कार्यालयाकडून जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांना पाठविण्यात आले आहे. खराब धान्य असल्यास ते माघारी पाठविण्याच्या सुचना केल्याचे श्री. काटकर यांनी सांगितले.