धनंजय कुलकर्णी ; १९ पासून पोलिस भरती प्रक्रिया
रत्नागिरी:- जिल्हा पोलिस दलातील रिक्त पदांसाठी बुधवारी (ता. १९) पासून पोलिस भरती प्रक्रिया होणार आहे. १४९ पदांसाठी ८ हजार ७१३ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहे. भरती प्रक्रिया अतिशय़ पारदर्शक होणार आहे. कोणाच्याही प्रलोभणाला बळी पडुन नका. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पथके नेमण्यात आली आहेत. डमी उमेदवार देऊन यंत्रणेची फसवणुक टाळण्यासाठी प्रथमच बायोमेट्रीक फेस (चेहरा) स्कॅन यंत्रणा वापरील जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.
ऑनलाईन झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड उपस्थित होत्या.
भरती प्रक्रियेसाठी पोलिस दलाची पुर्ण तयारी झाली आहे. जर पावसामुळे एखादे दिवशी मैदानी चाचणी होवू शकली नाही, तर उमेदवारांना पुढची सुयोग्य तारीख दिली जाईल. काही उमेदवारांना वेगवेगळ्या पदांसाठी एका पेक्षा जास्त ठिकाणी आणि एकाच दिवशी मैदानी चाचणी करिता हजर राहण्याची मेसेजद्वारे सूचना देण्यात आली आहे. तर अशा उमेदवारांना दुसरी तारीख रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाकडून दिली जाईल. उमेदवारांच्या मैदानी चाचणीच्या पहिल्या व दुसऱ्या तारखेमध्ये ४ दिवसांचे अंतर राहील. त्याच वेळी पुढील तारखा दिल्या जातील. याशिवाय उमेदवारांना काही अडचण / शंका असल्यास त्यांनी raunak.saraf@mahait.org यावर ईमेल करावा. पोलिस भरती २०२२ – 20२३ मधे ज्या उमेदवारांनी एका पेक्षा जास्त पदांसाठी अर्ज केले आहेत आणि त्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी आली असेल तर अशा उमेदवारांना किमान ४ दिवस अंतराने वेगवेगळ्या तारखा दिल्या जातील. याबाबत काही उमेदवारांना इतर अडचणी असल्यास त्यांचे निरसन पोलिस अधीक्षक कार्यालया मार्फत केले जाईल.
उमेदवारांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी असल्यास पोलिस नियंत्रण कक्ष WhatsApp क्रमांक: ८८८८९०५०२२, दुरध्वनी क्रमांक – ०२३५२-२७१२५७ व ईमेल sp.ratnagiri@mahapolice.gov.in, संपर्क साधावा.