रत्नागिरी:- शहराजिकच्या पोमेंडी खुर्द येथील जंगलमय परिसरात घरातून बेपत्ता झालेल्या प्रौढाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह सापडून आला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी उशिरा उघडकीस आली आहे.
दिनेश विठ्ठल पवार (४९,रा.पोमेंडी खुर्द, काजरघाटी, बौध्दवाडी) असे गळफास घेतलेल्या प्रौढाचे नाव आहे.याबाबत त्यांची पत्नी कोमल दिनेश पवार (३९,रा.पोमेंडी खुर्द,काजरघाटी, बौध्दवाडी) यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार, गुरूवारी सकाळपासून ते घरातून बेपत्ता असल्याने त्यांच्या पत्नीने शुक्रवारी सकाळी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तसेच ग्रामस्थ दिनेश पवार यांचा कालपासून शोध घेत होते.दरम्यान शुक्रवारी सायंकाळी पोमेंडी खुर्द येथील जंगलात दिनेश पवार हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. याबाबतची माहिती शहर पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक आकाश साळुंके व पोलीस हेडकॉन्स्टेबल नितीन जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठवला. रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याची कार्यवाही सुरू होती.