रत्नागिरी:- जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट दहा टक्केच्या खाली येत नाही तोपर्यत जिल्ह्याला आहे त्याहून अधिक शिथिलता मिळणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नियमित टेस्टिंग सात हजारपर्यत वाढवण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री ना. उदय सामंत यांनी सांगितले. पाच हजार लोकसंख्येवरील ग्रामपंचायतींमध्ये पंचायत समितीमार्फत मोबाईल वॅक्सिनेशन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अॅड. अनिल परब यांच्या उपस्थितीत ऑनलाईन झालेल्या आढावा बैठकीनंतर ना. सामंत यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी आमदार राजन साळवी, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांच्यासह जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी बबिता कमलापूरकर आदी उपस्थित होत्या. यावेळी ना. सामंत म्हणाले की, कोरोना बाधितांची टक्केवारी 10 पेक्षा खाली आली पाहिजे. जिल्ह्याचा राज्यस्तरावरील बाधित दर 14.35 टक्के असला तरी जिल्हापातळीवर तो 17.64 टक्के इतका आहे. त्यामुळे तो कमी होणे आवश्यक आहे. यामध्ये जिल्ह्यात सापडणारे रुग्ण, जिल्हाबाहेरुन आलेले रुग्ण, त्याचप्रमाणे अन्य जिल्ह्यांमध्ये सापडलेले परंतु रत्नागिरीचा पत्ता असलेले रुग्ण याचे वर्गिकरण होणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची खरी संख्या स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यात टेस्टिंगची संख्या वाढवण्यात आल्यानंतरही पाचशेच्या दरम्यान रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे टेस्टिंग आणखी वाढवायला हवे, दररोज किमान सात हजार टेस्टिंग करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला करण्यात आल्या आहेत.
रत्नागिरी व अन्य शहरांमध्ये प्रभागनिहाय 45 वर्षावरील व्यक्तींचे लसीकरण सुरु असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. केंद्र सरकारने सर्व लसीकरणाची जबाबदारी घेतल्याने, आपण त्यांचे आभार मानतो. आणखी आठ ते दहा दिवसात 18 ते 44 गटातील लोकांनाही लसीकरण प्रभागनिहाय करण्याबाबत नियोजन केले जाणार आहे. शहराप्रमाणेच ग्रामपंचायतींमध्ये 45 वर्षावरील व्यक्तींना प्रभागनिहाय लसीकरण केले जाणार आहे. जिल्ह्यातील कोरोनामुक्त असलेल्या 65 गावांमधील व्यक्तींना सर्वात प्रथम लसीकरण करण्याबाबत राज्य सरकारच्या आरोग्य विभागाची परवानगी घेतली जाणार आहे. त्याचप्रमाणे पाच हजार लोकवस्ती असणार्या मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये फिरते लसीकरण पथकाद्वारे लसीकरण केले जाणार आहे. रत्नागिरी तालुक्यात पावस, पाली व वाटदमध्ये पहिल्या टप्प्यात तर त्यानंतर अन्य गावांमध्ये टप्प्याटप्प्याने लसीकरण केले जाणार असल्याचे ना. सामंत यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात आतापर्यंत तीन लाख तीस हजारहून अधिक लसीकरण करण्यात आले आहे. त्यापैकी 67 हजार 136जणांनी दोन डोस घेतले असल्याची माहिती त्यांनी दिली.