पेट्रोल पंपाच्या वायरिंगचे काम करताना विजेचा शॉक लागून लांजात कामगाराचा मृत्यू

लांजा:- लांजा कुवे येथे नव्याने होत असलेल्या पेट्रोल पंपात लाईटच्या वायरिंगचे काम करत असताना विजेचा जोरदार शॉक लागल्याने ५४ वर्षीय प्रौढाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली आहे. सुनील भिकाजी साळवी (५४ वर्षे, रा. कुवे पुरावाडी) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. या घटनेची खबर रत्नदीप शिवराम जाधव (५० वर्षे, रा.वाकेड बौद्धवाडी, ता.लांजा) यांनी लांजा पोलिसांना दिली. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद पोलिस स्थानकात करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  मुंबई-गोवा महामार्गावर लांजा शहरानजीकच्या कुवे येथे महामार्गालगत नवीन पेट्रोल होत आहे. या पंपामध्ये सुनील भिकाजी साळवी (५४ वर्षे, रा. कुवे पुरावाडी) हे देखरेखीचे काम करत होते. सुनील साळवी हे बुधवारी सायंकाळच्या सुमारास पेट्रोल पंपात जमिनीवर असलेल्या लाईटच्या बोर्डात वायर लावत असताना त्यांना विजेचा जोरदार शॉक लागला. त्यामुळे ते जागीच निपचित पडले होते. पेट्रोल पंपामध्ये वॉचमनचे काम पाहणारे रत्नदीप जाधव हे थोड्या वेळाने त्यांच्या मुलासह पेट्रोल पंपावर आले असता त्यांना सुनील साळवी हे याठिकाणी निपचित पडलेले आढळून आले. त्यानंतर सुनील साळवी यांना उपचारासाठी त्यांनी तातडीने लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली असता त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून या प्रकरणी लांजा पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री ११.३० वाजता आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास लांजा पोलीस ठाण्यातील हेड. कॉन्स्टे. राजेंद्र कांबळे हे करत आहेत.