रत्नागिरी:- शंभर कोटी जनतेला कोरोना लस दिल्यामुळे देशभरात कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र पेट्रोल, डिझेलचे भाव शंभर रुपयांच्या वरती गेले आहेत. त्याचे नक्की काय करायचे. ते भाव कमी कसे करता येणार आहेत. त्याचे परिणाम सामान्यांना कसे सहन करावे लागत आहेत. हे दाखवून देण्यासाठी रत्नागिरीत केंद्र शासनाच्या निषेधार्थ रत्नागिरीत सायकल रॅलीचे काढण्यात आली आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.
पर्यावरणमंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार रविवारी (ता. 31) केंद्र शासनाच्या निषेर्धार्थ राज्यव्यापी आंदोलनाचा एक भाग म्हणून रत्नागिरीत भव्य रॅली काढण्यात आली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, तालुकाप्रमुख बंडया साळवी, उपजिल्हाप्रमुख बाबू म्हाप, प्रमोद शेरे, तालुका युवाधिकारी तुषार साळवी, शहर युवाधिकारी अभिजित दुडये, संजू साळवी, विकास पाटील यांच्यासह शेकडो युवासैनिक आणि नागरिक सहभागी झाले होते. मारुती मंदिर येथून ही सायकल रॅली जयस्तंभावर काढण्यात आली. पेट्रोल, डिझेल 100 पार, हेच का अच्छे दिन मोदी सरकारचे असे या रॅलीमध्ये लावण्यात आले होते. वाढत्या इंधन दराविरोधात निषेधही नोंदवला जात होता. इंधनाच्या वाढत्या दरामुळे त्रस्त नागरिकांना बैलगाडीने प्रवास करावा लागेल असा संदेश रॅलीमध्ये बैलगाडी ठेवण्यात आली होती. यामध्ये सहभागी झालेल्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सायकल सवारी करत केंद्राच्या इंधन दरवाढीचा निषेध नोंदवला. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, युवासेनाप्रमुख आदित्या ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यात रॅली काढण्यात येत आहे. रत्नागिरीतील शेकडो त्रस्त नागरिक यामध्ये सहभागी झाले आहेत. सध्या इंधनाचे वाढते दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने काहीतरी केले पाहीजे याची आठवण या निमित्ताने करुन दिली जात आहे. चारशे रुपयांच्या गॅस सिंलेडरची किंमत 1 हजारावर पोचली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांची आर्थिक घडी कोलमडली आहे. केंद्राला जाग येण्यासाठी अशी आंदोलनं केले जात आहेत.
ही रॅली यशस्वी करण्यासाठी रत्नागिरी तालुका युवाअधिकारी तुषार साळवी, शहर युवाधिकार अभिजित दुडये यांच्यासह केतन शेट्ये, देवदत्त पेंडसे, आशिष भालेकर, प्रथमेश साळवी यांनी नियोजन केले होते.