पूर्व वैमनस्यातून करबुडे मासेबाव येथे जोरदार धुमश्‍चक्री

रत्नागिरी:- पूर्व वैमनस्यातून करबुडे मासेबाव येथे चांगलीच धुमश्‍चक्री उडाली आहे. हॉटेलमध्ये घुसून काहीजणांच्या जमावाने हॉटेल मालकाला मारहाण करीत त्याला जबरदस्तीने गाडीत कोंबून अपहरण करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी ४० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी सायं. ६.३० वा. च्या सुमारास करबुडे-मासेबाव ते वेतोशी- करबुडे आदी ठिकाणी घडली.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक यशवंत रामगडे यांनी त्याबाबतची तक्रार दिली आहे. हॉटेलमध्ये गैरकायदा जमाव करुन रामगडे यांना मारहाण करत जबरदस्तीने त्यांचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार त्यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात दिली आहे.

यातील तक्रारदार दीपक यशवंत रामगडे (४१, रा. करबुडे-रामगडेवाडी) हे शनिवारी सायंकाळी करबुडे-मासेबाव येथील आपल्या हॉटेल सिद्धीविनायक येथे साफसफाई करण्याकरीता आले होते. हॉटेलमध्ये साफसफाई करीत असतानाच त्यांना हॉटेलबाहेर अचानक जमाव जमत असल्याचे दिसून आले.

रामगडे यांच्या हॉटेल सिद्धीविनायक बाहेर काही क्षणात मोठा जमाव जमला. जवळजवळ ४० जणांचा जमाव हॉटेलवर चाल करुन गेला. यावेळी संतोष झोरे, संतोष कोकरे व जगदीश झोरे यांनी हॉटेलच्या पाठीमागील दरवाजावर लाथ मारुन हॉटेलचा दरवाजा तोडला.

रामगडे यांच्या हॉटेल सिद्धीविनायकमध्ये घुसलेल्या जमावाने हॉटेलमध्ये एकच राडा केला. यावेळी गैरकायदा जमाव करुन दीपक रामगडे यांना मारण्यासाठी सारेजण त्यांना आतमध्ये शोधू लागले. यावेळी काहींनी ‘अरे आतमध्ये लपून बसलास काय?’ असे मोठमोठ्याने ओरडण्यास सुरुवात केली.
अचानक जमाव चाल करुन आल्याने दीपक रामगडे हे एका खुर्चीच्या पाठीमागे लपून बसले होते. त्यावेळी जमावाने त्यांना शोधून काढत त्यांची कॉलर पकडून बाहेर ओढत आणले आणि जबर मारहाण करण्यास सुरुवात केली.

मारहाण होत असतानाच जमावातील काहींनी हातातील दांडक्यांनी दीपक यांना मारहाण करण्यास सुरुवात केली तर काहींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्यांना जमिनीवर पाडले होते. सायंकाळी ६.३० वा. च्या सुमारास करबुडे – मासेबाव येथील हॉटेल सिद्धीविनायकमध्ये धुमशान सुरु झाले. हॉटेल मालक दीपक रामगडे यांना यथेच्छ मारहाण करुन त्यांना हॉटेलबाहेर ओढत आणले व एका क्वालिसमध्ये जबरदस्तीने त्यांना कोंबले.

रामगडे यांना मारहाण करुन त्यांना क्वालिसमध्ये कोंबल्यानंतर ही क्वालिस वेतोशीच्या दिशेने भरधाव वेगाने गेली व त्या ठिकाणी देखील रामगडे यांना जबर मारहाण करण्यात आली.

रामगडे यांना झालेली मारहाण ही नेमकी कोणत्या कारणातून झाली ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र त्यांना गाडीत कोंबून वेतोशी येथे नेल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा मारहाण झाली. त्यावेळी रामगडे यांनी आत्महत्येची धमकी दिली. या धमकीनंतर जमावाने त्यांना सोडून दिले.

या प्रकरणी दीपक यशवंत रामगडे यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार दिली. या तक्रारीवरुन पोलिसांनी संतोष झोरे, संतोष कोकरे, व जगदीश झोरे यांच्यासह ४० जणांविरोधात भा. दं. वि. क. १४१, १४३, १४७, १४९, ३६३, ३२४, ४२७, ४५२ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) /१३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास ए. पी. आय. पाटील करीत आहेत.