पूर्णगड येथील तरुणाची बलात्काराच्या आरोपातून निर्दोष सुटका

रत्नागिरी:- पूर्णगड येथील तरुणाची पुराव्याअभावी २८ मार्च २०२३ रोजी रत्नागिरी सत्र न्यायालयाने बलात्काराच्या खटल्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे.

पूर्णगड सागरी पोलीस ठाण्यात १ फेब्रुवारी २०२१ रोजी बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. बलात्काराच्या खटल्यातील आरोपी सुभाष सीताराम चौगुले हा होता. बलात्काराच्या प्रकरणामधील महत्वाचा असलेला डीएनए अहवाल हा अभियोग पक्षाच्या बाजूने होता. मात्र डीएनए अहवालाच्या अनुषंगाने गोळा केलेले घटनास्थळावरील जैविक नमुने वैद्यकीय न्यायशास्त्रानुसार सुसंगत नाहीत. याशिवाय सर्वात महत्वाचे म्हणजे बलात्काराबाबतचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी न्यायालयात दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्र व वैद्यकीय पुरावे हे आपापसात सुसंगत नाहीत. तसेच हे पुरावे वैद्यकीय न्यायशास्त्रांच्या तत्वांच्या अगदी विरोधात आहेत. या सर्व बाबींमुळे अभियोग पक्षाच्या दिलेल्या पुराव्यांवरच संशय निर्माण होतो, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.

या केसमध्ये आरोपीच्या वकिलांकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. गुन्हा घडलेल्या घटनास्थळावरून जैविक पुरावे व प्रयोगशाळेतील विश्लेषणाचे पुरावे यातील एकमेकांना जोडणारी साखळी आवश्यक असलेल्या वैद्यकीय नियम व नियमावलीनुसार सिध्द झालेली नाही. याशिवाय केसमध्ये पीडितेची असलेली एकमेव साक्ष विश्वसनीय नाही आहे. तसेच पोलिसांनी केलेले तपासकाम हे सदोष स्वरुपाचे आहे. असा एकामागून एक प्रकारे युक्तीवाद करत आरोपीच्या वकिलांकडून केसमधील त्रुटी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. तपासकामात असलेल्या अन्य अनेक त्रुटींचा या केसवर झालेला परिणाम असा आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आलेला युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरला व आरोपी सुभाष चौगुले याची निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने ॲड. प्रवीण प्रकाश सुर्वे यांनी कामकाज पाहिले तर त्यांना ॲड. यतिन धुरत, ॲड. दिपेंद्र नागवेकर व ॲड. विवेक भोसले यांनी सहकार्य केले.