रत्नागिरीः– जागतिक पातळीवर काम करणाऱ्या युनेस्कोने भारतीय पुरातत्व सर्वेक्षणामार्फत पाठविण्यात आलेल्या कोकणातील कातळशिल्पांच्या प्रस्तावाचा तत्वतः स्विकार केला आहे. त्यामुळे पुरातन कातळशिल्पांना युनेस्को जागतिक वारसा स्थळांचा दर्जा लवकरच प्रप्त होणार आहे.या नामांकनामुळे कातळशिल्पे आणि किल्ल्यांचे महत्त्व जागतिक पातळीवर अधोरेखित होऊन आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा ओघ वाढण्यास मदत होणार आहे.
युनेस्कोतर्फे जागतिक पातळीवर जनजागृतीसाठी दरवर्षी दि.१८ एप्रिल हा जागतिक वारसा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी जटिल भूतकाळ आणि विविधतापूर्ण भविष्य ही संकल्पना पुढे ठेऊन हा दिवस साजरा करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्य विभाग यांच्यामार्फत भारतीय पुरातत्व सर्वेक्षणामार्फत सादर करण्यात आलेल्या कोकणातील कातळशिल्पे या प्रस्तावांचा युनेस्कोने तत्वत: स्वीकार केला आहे
या नामांकन प्रक्रियेत छत्रपती शिवाजी महाराजांचे डोंगरी व समुद्री किल्ले ‚रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणा, प्रतापगड, लोहगड, पन्हाळा, रांगणा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, पद्मदुर्ग, कुलाबा आदी किल्ल्यांचा तसेच कशेळी, बारसू, रुंढेतळी, देवीहसोळ, जांभरुण, उक्षी, कुडोपी या कातळशिल्पस्थानांचा समावेश आहे.जागतिक वारसा स्थळासाठी युनेस्कोकडून नामांकन मिळवण्यासाठी विस्तृत प्रस्ताव पुरातत्व व वास्तुसंग्रहालये संचालनालायमार्फत व इनटक या संस्थेच्या मदतीने तयार करण्यात येणार आहे.
त्यामध्ये वास्तुविशारद शिखा जैन, तेजस्विनी आफळे अशा आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात येणार आहे.गेली अनेक वर्षे कातळशिल्पांवर संशोधन सुरु आहे. कातळशिल्प शोध मोहिमेचे प्रमुख सुधीर रिसबुड, धनंजय मराठे आणि डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई यांच्यामार्फत कातळ शिल्प शोध मोहिम सुरु करण्यात आली. या टीमने सड्यावरील जवळपास सर्व कातळशिल्प शोधून जगासमोर आणली आहेत तसेच देवाचे गोठणे येथील चुंबकीय विस्थापनाचा देखील शोध लावला आहे. आतापर्यंत रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७२ गावातून १५०० पेक्षा अधिक कातळशिल्पांचा शोध घेतला आहे.
कोकणात आजपर्यंत पर्यटन केवळ समुद्रकिनारे व डोंगरी भागात होत होता, कातळशिल्पामुळे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय कलाप्रेमी पर्यटक कोकणातील सड्यांकडे वळतील व स्थानिक अर्थकारणास हातभार लागेल. कातळशिल्पांच्या शोधामुळे कलेचा इतिहास हजारो वर्षे मागे गेला आहे. जागतिक पातळीवरील तज्ज्ञ यामुळे भारतीय संस्कृतीचा पाया अश्मयुगातच रचला गेला या दृष्टीकोनातून बघू शकतील.