रत्नागिरी:- जिल्ह्यात हाहाकार उडवून दिलेली पूरस्थिती अजूनही कायम आहे. अपेक्षेप्रमाणे पाण्याची पातळी कमी होताना दिसत नाही. चिपळूण, खेड, संगमेश्वर, राजापूर, रत्नागिरीमध्ये अजूनही ठिकठिकाणी पाणी भरलेले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले असून मोठ्या प्रमाणात वित्त व जीवितहानी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये महावितरणच्या ग्राहकांना मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील २१५ गावे यात प्रभावित झाली आहेत. १ हजार २२९ ट्रान्सफॉर्मर बंद आहेत. एकूण १ लाख ६५ हजार वीज ग्राहक अंधारात आहेत.
जिल्ह्यात मुसळधार पावासाने दाणादाण उडवून दिली आहे. ढगफुटीप्रमाणे पडणाऱ्या पावसाने चिपळूण, खेड, संगमेश्वर, राजापूर, लांजा आणि रत्नागिरीतील सोमेश्वर आदी भाग पाण्याखाली गेला. चिपळूणची परिस्थिती भयावह आहे. हजारो नागरिक घर, इमारती आदी ठिकाणी अडकून पडली आहेत. त्यांना अजून मदत मिळालेली नाही. काल उशिरा मदतकार्याला सुरवात झाली. त्यामुळे प्रशासनाच्या आपत्कालीन यंत्रणेबाबत प्रचंड नाराजी आहे. नागरिक जीव मुठीत घेऊन मदतीच्या प्रतीक्षेत आहेत; मात्र बचाव यंत्रणा अपेक्षित वेगाने त्यांच्यापर्यंत पोचत नाही. जिल्ह्यातील सामाजिक संस्था, मंडळे, काही तरुणांनी पुढाकार घेऊन मदत कार्यासाठी चिपळूण, खेड आदी ठिकाणी रवाना झाले आहेत. परिस्थिती अतिशय विदारक आणि भयानक आहे.पुराचा मोठा फटका महावितरण कंपनीच्या ग्राहकांना बसला आहे. पुरामुळे
जिल्ह्यातील २१५ गावे प्रभावित झाली आहेत. महावितरणच्या मुख्य वाहिन्या, ट्रान्सफॉर्मर, विद्युत खांब आदी पाण्यात गेल्याने महावितरण कंपनीने दक्षता म्हणून या भागातील वीज पुरवठा खंडित केला आहे. ज्या ठिकाणी पाणी ओसरत आहे त्या ठिकाणी हळूहळू विद्युत पुरवठा सुरू करण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील एकूण ४४२ गावांपैकी २२७ गावांमध्ये विद्युत पुरवठा सुरू झाला आहे. तर २१५ गावामधील विद्युत पुरवठा बंद आहे. एकूण ५५ उपकेंद्रांपैकी ४० केंद्र सुरू तर १५ बंद आहेत. २ हजार २१८ ट्रान्सफॉर्मरपैकी ९८९ सुरू आहेत. तर १ हजार २२९ बंद आहेत. महावितरणचे जिल्ह्यात ५ लाख ५४ हजार ९२१ वीज ग्राहक आहेत. त्यापैकी १ लाख ६५ हजार वीज ग्राहक अंधारात आहेत.