धान्य दुकान चालक-मालक संघटनेकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार
रत्नागिरी:- जिल्ह्यातील रास्त दर धान्य दुकान चालक-मालक संघटनेच्या प्रतिनिधींनी गुरुवारी जिल्हाधिकारी डॉक्टर बी. एन. पाटील यांची भेट घेतली व त्यांच्या समोर समस्यांचा पाढा वाचला. त्याचप्रमाणे अधिकार्यांकडून तपासणीच्या नावाखाली होणार्या छळाची माहिती देण्यात आली. यावेळी अधिकार्यांची चौकशी करण्याचे आश्वासन जिल्हाधिकार्यांनी दिले.
रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसिन चालक-मालक संघटनेच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकार्यांची भेट घेण्यात आली. यावेळी अध्यक्ष अशोकराव कदम, सचिव नितीन कांबळे, प्रशांत पाटील, शशिकांत दळवी व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी रेशनिंगसंदर्भातील वस्तूस्थिती जिल्हाधिकार्यांसमोर मांडली व त्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकार्यांनी आपण एफसीआयमध्ये सुरु असलेल्या संपाबाबत तोडगा काढला असल्याची माहिती दिली. त्याचप्रमाणे पॉस मशिनचा प्रश्नही समजावून घेतला. रेशनदुकानदारांनी ग्रामीण भागातील जनतेपयर्र्त धान्य पोहच करावे असे आवाहन केले.
यावेळी जिल्हा पुरवठा विभागातील अधिकारी वर्गाकडून दुकानदारांना नाहक त्रास दिला जात असल्याचे सांगण्यात आले. पॉस मशिन वारंवार बंद पडत असल्याने,या महिन्याच्या अखेरीस ती पुरवठा कार्यालयात जमा केली जाणार असल्याचेही संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले. यापूर्वीही त्रास देणार्या अधिकार्यांबाबत तक्रार करण्यात आली होती. अशी माहिती संघटनेच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकार्यांना दिली. तक्रारीची प्रत आपल्याला द्यावी, त्यावर आपण कारवाई करु, त्याचप्रमाणे मागील तक्रार अर्जावर काय निर्णय झाला याचीही चौकशी करु असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी संघटनेच्या प्रतिनिधींना दिले.