पुणे:- राज्याचे माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील कात्रज चौकात उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाला आहे. शिवसैनिकांनी हा हल्ला केला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. शिवसैनिकांनी उदय सामंत यांच्या गाडीला घेराव घातला होता आणि त्याच दरम्यान सामंत यांच्या गाडीवर दगड भिरकावण्यात आला. या हल्ल्यात उदय सामंत यांच्या गाडीची काच फुटली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उदय सामंत यांच्या गाडीवर दगड भिरकावण्यात आला आहे. हा दगड भिरकावण्यात आल्याने उदय सामंत यांच्या गाडीची काच फुटली आहे. तसेच गाडीतील एका व्यक्तीला दुखापत झाली असल्याचं वृत्त समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. त्याच दरम्यान एकनाथ शिंदे गटाला समर्थन देणाऱ्या उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या हल्ल्यानंतर सामंत हे थेट कोथरूड पोलिस ठाण्यात जाऊन तेथे त्यांनी तक्रार दिली. दरम्यान, सामंत यांच्यावर हल्ला झाल्याचा प्रकार कळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामंत यांच्याशी संपर्क साधून चौकशी केली. तसेच पोलिस आयुक्तांशीही चर्चा करून घटनेची माहिती घेतली. सामंत यांच्यावर हल्ला झाल्याने पोलिसांनी शहरातील बंदोबस्त कडक केला.