रत्नागिरी:- लहान मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांना व्यासपीठ उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. पुढील वर्षापासून रत्नागिरीत जिल्हास्तरीय ‘आनंद जत्रा’ घोषणा राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी केली. शहरातील राम मंदिरात लहान मुलांच्या ‘आनंद जत्रा’ कार्यक्रमात ते बोलत होते.
राम मंदिर देवस्थानच्यावतीन तालुक्यातील लहान मुलांसाठी ‘आनंद जत्रा’चे आयोजन केले होते. या जत्रेला ना.सामंत यांनी भेट देत चिमुकल्यांशी संवाद साधला. यावेळी देवस्थानच्या अध्यक्षा ऐश्वर्या घोसाळकर, पत्रकार अलिमिया काझी,सुधाकर सावंत, प्रताप सावंतदेसाई, राकेश चव्हाण यांच्यासह देवस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना.सामंत म्हणाले, नव्या वर्षातील कामाची सुरवात श्री राम मंदिरातून झाली. याचा मला आंनद आहे. वर्षांच्या सुरुवातीलाच चिमुकल्यांशी संवाद साधता आला. देशाचे उद्याचे नागरिक हे सर्व श्रेत्रात पारंगत असणे गरजेचे आहे. तर त्यांना व्यासपीठ उपलब्ध करुन देणे हे राज्यकर्ते म्हणून आपली जबाबदारी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ९ मुले नासाला निघाले आहे. उद्या त्यातूनच एक अब्दूल कलाम तयार होईल. तर इस्त्रोला २७ मुलांना पाठविण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. नासाला जाण्यासाठी आवश्यक कठीण परिक्षा आपल्या मुलांना दिली आहे. त्यातून ते उर्तीर्ण झाले आहे. एवढे ज्ञान आपल्या विद्यार्थ्यांनमध्ये आहे. त्यांच्या कलागुणांना वाव देणे आपली जबाबदारी असल्याचे ना.सामंत म्हणाले.
श्री राम मंदिर देवस्थानने ‘आनंद जत्रा’भरवली आहे. याच धर्तीवर जिल्हास्तरीय ‘आनंद जत्रा’राज्य शासनामार्फत भरवली जाईल. त्यामध्ये एक दिवस चिमुकल्यांना धम्माल करण्याची संधी आपण उपलब्ध करुन देणार असल्याची घोषणा ना.सामंत यांनी केली.