रत्नागिरी:- आधुनीक तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करुन आपल्या सात बार्यावरील जमीनीत लागवड केलेल्या पीकाची पीक पाहणी करण्याची शेतकर्यांना संधी दिली आहे. शासनाने ई पीक पाहणी या नावाचे मोबाईल अॅप तयार केलेले असुन त्याचा उपयोग शेतकरी आपल्या जमीनीतील पीकांची नोंदी सात बाराला करण्यासाठी करु शकतील. आपल्या जमीनीची पीक पाहणी नोंद करण्याचा आता शेतकर्यांना अधिकार आहे, असे तहसीलदार शशिकांत जाधव यांनी सांगितले.
तालुक्यातील शेतकरी, आंबा बागायतदार यांना माहिती देण्यासाठी पटवर्धन हायस्कुल सभागृहात आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी श्री. जाधव म्हणाले, शासनाने ही सुविधा शेतकर्यांना उपलब्ध करुन दिलेली आहे. शेतकर्यांनी आपल्या जमीनीतील पीकाची नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये ई पीक पाहणी अॅप डाऊनलोड करावे, त्यानंतर अॅप सुरु करुन त्यात आपला मोबाईल नंबर टाकुन नोंदणी करावे, त्यानंतर आपला विभाग, जिल्हा, तालुका व गाव निवडावे आणि त्यानंतर आपला परिचय या पर्यायात आपली माहिती भरावी. त्यानंतर होम पेजवरील पिकाची माहिती या टॅबमध्ये आपला खाता क्रमांक टाकावा, त्यात जमीनीचे क्षेत्र , पोट खराबा क्षेत्र दिसेल, त्यानंतर आपल्या पिकानुसार खरीप, रब्बी व संपुर्ण वर्षे यापैकी एक हंगाम निवडावा, त्यानंतर शेतकर्यांनी लागवड केलेले पीक निवडावे आणि पिकाखालील क्षेत्र नमुद करावे, पिकास सिंचन करीत असल्यास जलसिंचनाचे साधन निवडावे आणि त्यानंतर आपल्या मोबाईलमधील जीपीएस लोकेशन सुरु करुन आपल्या शेतातील पिकाचा फोटो घ्यावा व अपलोड करावा. सदरचा फोटो हा आपल्या शेतजमीनीपासुन 200 मीटर आतमधीलच असला पाहीजे, अन्यथा सदर पीक पाहणी त्रुटीत काढण्यात येते आणि 200 मी किंवा त्यापेक्षा कमी अंतरावरुन फोटो घेतल्यास सदर पीक पाहणी मान्य होते. फोटो हा किती अंतरावरुन घेतला आहे, याबाबत या अॅपमध्ये पिकाचा फोटो घेतल्यावर लगेच माहिती येते की किती अंतरावरुन फोटो घेतला आहे आणि सर्वात शेवटी ही पिकाची नोंदणी नोंदवण्याच्या बटनावर क्लिक केल्यावर नोंदणी पुर्ण होते.
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी डॉ. विकास सुर्यवंशी यांनी ई पीक पाहणी करताना काही अडचणी आल्यास मंडल अधिकारी व तलाठी यांना संपर्क करण्याचे आवाहन केले. या शेतकरी मेळाव्याला निवडणुक नायब तहसीलदार श्रीमती कांबळे, महसुल सहायक अमोल कांबळे, सुशील कोळंबेकर, परिमल डोर्लेकर यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.