चिपळूण:– बिनशेती जमिनीचे दोन समान भागात हिस्से करून विभाजन करण्यासाठी ४५ हजारांची लाच घेणाऱ्या पिंपळी खुर्द येथील तलाठ्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
लाचखोर तलाठ्याने काही महसुली कार्यालयांचा नामोल्लेख केल्याने त्यावरूनही गोंधळ उडाला आहे. तलाठी अश्विन नंदगवळी (वय ३३) याने तक्रारदार व त्याचे सहहिस्सेदार यांच्या नावे असलेली बिनशेती जमीन दोन समान हिस्से करण्यासाठी लाच स्वीकारली. बिनशेती विभाजनाचे आदेश प्राप्त करून घेण्यासाठी प्रांत कार्यालयाच्या नावाने ४० हजार रुपये व सातबारा वेगळा करण्यासाठी मंडळ अधिकाऱ्यांसाठी ५ हजार असे एकूण ४५ हजार रुपये नंदगवळी याने संबंधितांकडे १ जून रोजी मागितले होते. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांकडे तक्रार आल्यानंतर त्यांनी पडताळणी केली. त्यानुसार २२ जूनला सापळा रचून पिंपळी खुर्द येथील तलाठी कार्यालयात नंदगवळी याला ४५ हजाराची लाच स्वीकारताना पंचाच्या समक्ष रंगेहाथ पकडले होते. तलाठी नंदगवळी याला अटक केल्यानंतर त्याच्या विविध कारनाम्यांच्या चर्चा तालुक्यातील दसपटी विभागात सुरू झाल्या आहेत.