पासपोर्टसाठी रचला बनाव; अमेरिकेतील महिला रत्नागिरीच्या मनोरुग्णालयात दाखल

रत्नागिरी:- सावंतवाडीतील रोणापाल येथील जंगलात लोखंडी साखळीने बांधलेल्या स्थितीत आढळलेल्या ‘त्या’ विदेशी महिलेने यापूर्वी सांगितलेली माहिती बनावच असल्याचे आता पुन्हा तिने दिलेल्या जबाबात स्पष्ट झाले आहे. पासपोर्टची मुदत संपल्यामुळे अमेरिकेत परत जाण्यासाठी मी प्रयत्न करत होते, मात्र त्यात अनेक अडचणी येत असल्याने अखेर आपण नैराश्यातून असे केल्याचे तिने सांगितले. यावेळी कोकण रेल्वेतून मडुरा येथील स्थानकात उतरून तेथील जंगल वाटेतून गेल्याचेही तिने सांगितले. मूळची अमेरिकेची असलेली महिला सिंधुदुर्गातील जंगलात लोखंडी साखळीने बांधलेल्या अवस्थेत आढळली होती.

सावंतवाडीतील कराडीच्या डोंगरातील घनदाट जंगलातून स्थानिक शेतकरी आणि गुराख्यांना या महिलेच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यानंतर त्यांनी आवाजाच्या दिशेनं जात पाहिलं, तर तिथं ही महिला लोखंडी साखळीनं बांधलेल्या अवस्थेत आढळली. जंगलामध्ये अन्न पाण्याविना 40 दिवसांपासून अशा अवस्थेत आहोत, असा दावा या महिलेनं कागदावर लिहून केला होता. मात्र, एवढे दिवस अन्न पाण्याविना ती कशी राहिली? असा प्रश्न उपस्थित झाला होता. “माझ्या पतीनं मला झाडाला बांधून ठेवलं होतं. याच जंगलात तुझा अंत होईल. मी पीडित असून यातून बचावले. पण तो या ठिकाणाहून पळून गेला आहे,” असं महिलेनं इंग्रजीमध्ये लिहून दिले होते. मात्र ती महिला मनोरुग्ण असून तिच्या पासपोर्टची मुदत संपल्याने अमेरिकेत जाण्यासाठी अडचणी येत असल्याने नैराश्येतून हे कृत्य स्वतः केल्याची माहिती तिने आता अंतिम जबाबात दिली आहे. तिचे आधारकार्ड देखील बनावट असल्याची माहिती समोर आली आहे.

बांबोळी-गोवा येथून आणल्यानंतर ओरोस येथील जिल्हा रुग्णालयातून सदर महिलेला रत्नागिरी येथील मनोरुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी पून्हा तिचा जबाब नोंदविला आहे. त्यावेळी तिने सर्व कृत्य आपण नैराश्यातून केल्याचे कबुल केले असून अखेर या प्रकरणाला पूर्ण विराम मिळाला आहे.