रत्नागिरी:- जिल्ह्यात संततधार पावसाबरोबरच किनारी भागात वेगवान वार्यांनी धुमाकुळ घातला आहे. पावसामुळे खेड आस्तान येथे दरड कोसळली असून चिपळूण राधानगरी येथे डोंगरात मोठी भेग पडली आहे. जगबुडी आणि नारिंगी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून पावसाचा जोर वाढला तर शहरात पाणी शिरण्याची शक्यता आहे.
मंगळवारी (ता. १२) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोविस तासात सरासरी ७३.७८ मिमी पाऊस झाला. त्यात मंडणगडला १०५ मिमी, दापोली ६२, खेड १२१, गुहागर १५, चिपळूण ९३, संगमेश्वर १०८, रत्नागिरी १४, लांजा ९५, राजापूर ५१ मिमी नोंद झाली आहे.
गेले आठ दिवस खेड तालुक्यात संततधार सुरु होती आहे. त्यामुळे जगबुडी, नारंगी नद्या दुथडी भरून असून धोक्याची पातळी ओलांडली आहे. पावसाचा जोर वाढतच राहीला तर खेड शहरात कधीही पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते. अशी निर्माण झाल्यास मदतीसाठी एनडीआरएफचे पथक तैनात केले आहे. १८ प्रशिक्षित जवान आणि दोन वरिष्ठ अधिकारी खेड शहर व परिसरातील पूर्वपरिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. दरड प्रवण क्षेत्रात राहणार्या ग्रामस्थांच्या सुरक्षेची जबाबदारी याच पथकावर आहे. खेड मधील आस्तान धनगरवाडी येथे दरड कोसळली आहे. त्यामुळे तेथील लोकवस्तीला धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मुसळधार पावसामुळे सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या चिपळूण तालुक्यातील नांदीवसे ग्रामपंचायतीमधील राधानगरवाडीच्या वरील डोंगरास २०० मीटरची भेग पडली. गावकर्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी ग्रामस्थांशी चर्चा सुरु आहे. समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील भात लावण्यांची कामे वेगाने सुरु आहेत. जिल्ह्यात ७० हजार हेक्टरवर भात लागवड होते. आतापर्यंत ३० हजार हेक्टरवरील भात लागवड पूर्ण झाली आहे. साधारणपणे चाळीस टक्केहून अधिक लागवडीची कामे पूर्ण झाल्याचे जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले.