पावसाळ्यापूर्वी रनपकडून धोकादायक वृक्षांची पाहणी

रत्नागिरी:- पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरात शेकडो वर्ष वयाचे धोकादायक पुरातन वृक्षांची रत्नागिरी नगर परिषदेकडून पाहणी केली जात आहे. जे धोकादायक वृक्ष खासगी मालकीच्या जागेत आहेत त्या जागा मालकांना योग्य दक्षता घेण्यास सांगितली जात आहे. त्याचबरोबर रत्नागिरी नगर परिषदेच्या जागेत असलेल्या धोकादायक वृक्षांबाबत आवश्यकती दक्षता घेतली जात आहे.

यंदा पावसाळा लवकर सुरू होवून तो समाधानकारक असण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती बसस्थानकापासून खालच्या भागात परिघीय किंवा सभोवताली दाटीवाटीची वस्ती आहे. या भागामध्ये अनेक पुरातन किंवा शेकडो वर्ष जुने पिंपळ, वड, चिंच असे मोठ्या बुंद्यांचे आणि विस्तारलेले वृक्ष आहेत. यातील काही वृक्ष पोखरलेले आणि पूर्णपणे सुकलेले आहेत. यातील धोकादायक वृक्षांची माहिती जमा केली जात आहे. मुसळधार पावसासह जोरदार वार्‍याच्या वेळी या वृक्षांना पर्यायाने माणसांसह घर, दुकानांना धोका होण्याची भिती असते. असे वृक्ष हेरून आवश्यकती सुरक्षिततेची काळजी घेतली जात आहे. मारूती आळी येथील एक मोठे चिंचेचे खासगी जागेतील झाड दाट लोकवस्तीत असून ते जमिनीजवळच पोखरल्याने धोकादायक बनले आहे.