रत्नागिरी:- यंदा पावसाळ्यात समुद्राला तब्बल २२ दिवस मोठी भरती येणार आहे. या काळात साडेचार मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. २० सप्टेंबरला पावसाळ्यातील सर्वांत मोठी भरती समुद्रतटीय नागरिकांना अनुभवता येणार आहे.
मान्सूनदरम्यान समुद्राला येणाऱ्या संभाव्य मोठ्या भरतीचे अंदाजपत्रक आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत जाहीर करण्यात आले आहे. यावर्षी पावसाळ्यात २२ दिवस समुद्राला मोठे उधाण येईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यात जूनमधील सात दिवस, जुलैमधील चार, ऑगस्टमधील पाच आणि सप्टेंबरमधील सहा दिवसांचा समावेश आहे. या दिवशी समुद्राला साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा आणि मोठी भरती येणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर समुद्र, खाडी तसेच नदी किनाऱ्यावरील गावांना स्थानिक पातळीवर आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.