रत्नागिरी:- कोकण किनारपट्टीवरील पावसाळी बंदी काळात मासेमारी करणाऱ्या अवैध बोटी जप्त करण्यात येतील. असे सांगून बेकायदा मासेमारीला प्रोत्साहन देणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असे आदेश मंत्री ना. सुधिर मुनगंटीवार यांनी दिल्याची माहीती कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश पाटील दिली.
मच्छीमार बांधवांच्या विविध प्रश्नांसंदर्भात तसेच बेकायदा सुरू असलेल्या मासेमारीबाबत मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे बैठक पार पडली. या बैठकीस कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भाजपा आमदार रमेशदादा पाटील, भाजपा मच्छीमार सेल अध्यक्ष ॲड. चेतन पाटील व कोकणातील विविध मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पावसाळ्याच्या हंगामात माशांच्या प्रजनन काळात कोकण किनारपट्टीवर मासेमारी करण्यास बंदी असून सुद्धा मोठ्या प्रमाणात बेकायदा मासेमारी करण्यात येत असल्याच्या मच्छीमार बांधवांकडून वारंवार तक्रारी होत आहेत. त्यामुळे मत्स्य व्यवसाय मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये आम. रमेशदादा पाटील यांनी कोकण किनारपट्टीवर पावसाळ्याच्या बंदी काळात बेकायदा होत असलेल्या मासेमारीवर बंदी घालण्याची मागणी केली. तसेच मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून समुद्रात अवैधरित्या मासेमारी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री यांच्या निदर्शनास आणून दिले व या अवैद्य मासेमारीविरुद्ध कडक कायदे करण्याची मागणी आम. रमेशदादा पाटील यांनी मंत्री महोदयांकडे केली. यावेळी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, मुंबई, ठाणे या जिल्ह्यातील मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
याबाबत माहीती देताना आम. रमेशदादा पाटील यांनी पावसाळी बंदी काळात मासेमारी करणाऱ्या बोटी जप्त करण्यात येतील. तसेच बेकायदा मासेमारीला प्रोत्साहन देणाऱ्या मत्स्य अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असे मंत्री महोदयांनी सांगितले असल्याची माहिती दिली. बेकायदा मासेमारी थांबविण्यासाठी पोलिसांची मदत घेण्याच्या सूचना मत्स्य व्यवसाय मंत्र्यांनी दिल्या असून अवैधरित्या सुरू असलेल्या मासेमारी विरुद्ध कडक कायदे करण्यात येतील असे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले. तसेच मच्छीमार बांधवांच्या तक्रारीकरीता मत्स्यव्यवसाय विभागामार्फत लवकरच टोल फ्री क्रमांक जारी केला जाणार असल्याचे आम. पाटील यांनी सांगितले.