पावसाचा परतीचा प्रवास सुरू; यावर्षी गाठली जेमतेम सरासरी

रत्नागिरी:- कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यात पुढील पाच दिवस हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला असून अखेरच्या टप्प्यात विजांचा गडगडाटासह समारोप होणार आहे. यंदा पावसाने जेमतेम सरासरी गाठली असून त्याचे परिणाम पाणीटंचाईवर होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

यंदा मोसमात जून आणि ऑगस्ट महिना कोरडा गेल्याने पाऊस सरासरी पूर्ण करण्याची शक्यता कमी झाली होती. मात्र, जुलै आणि सप्टेंबर महिन्यात पावसाने जोर धरला. अन्यथा यंदाची सरासरी पूर्ण होणे शक्य नव्हते. सप्टेंबर हा मोसमी पावसाचा शेवटचा महिना मानला जातो. यंदा अखेरच्या सत्रात पावसाची सरासरी पूर्ण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 3177 मिलीमिटर सरासरी पाऊस झाला. जिल्ह्यात पावसाची 3242 मिमी सरासरी पाऊस दरवर्षी पडतो. त्यानुसार यंदा जेमतेम सरासरी गाठण्यास यश आले आहे. मान्सूनचे प्रस्तान 5 ते 12 ऑक्टोबरदरम्यान सुरू होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाकडून प्राप्त माहितीनुसार 25 सप्टेंबरपासून पूर्व राजस्थानातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. 5 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्राच्या उत्तर भागातून तो परतीला निघेल. संपूर्ण राज्यातून तो 12 ऑक्टोबरपर्यंत परतीच्या प्रवासाला जाईल. कोकणसह घाट माथ्यावर हलका ते मध्यम पाऊस 8 ऑक्टोबरपर्यंत राहील. त्यामुळे अजुन काही दिवस रत्नागिरी जिल्ह्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, यंदा हंगामात सर्वाधिक पावसाची नोंद दापोली तालुक्यात 4058 मिमि झाली, तर सर्वात कमी पाऊस रत्नागिरी 2515 आणि गुहागर तालुक्यात 2447 मिमि झाला आहे. या वर्षी मंडणगड तालुक्यात 3588 मि. मी., खेड 2657, चिपळूण 3644, संगमेश्वर 3405, लांजा 3320 आणि राजापूर तालुक्यात 2849 मि.मी. नोंद झाली आहे.