पावसाचा जोर कायम, तोणदेतील सांब मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा

रत्नागिरी:- जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, शुक्रवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे काजळी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. या नदीचे पाणी आजूबाजूच्या शेतात पसरले असून, तोणदे (ता. रत्नागिरी) गावातील श्री सांब मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे.

शुक्रवारी (२१ जुलै) रात्रीपासून पावसाचा जाेर वाढला आहे. त्यामुळे नद्यांचे पाणी वाढले आहे. रत्नागिरी तालुक्यातील काजळी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली असून, नदीचे पाणी आजूबाजूच्या शेतामध्ये पसरले आहे.

ताेणदे गावात शंकराचे पुरातन स्वयंभू सांब मंदिर आहे. हे मंदिर काजळी नदीकिनारी वसलेले आहे. या मंदिराला काजळी नदीला आलेल्या पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. मंदिराच्या सभाेवताली पुराचे पाणी साचल्याने मंदिरात जाण्याचा मार्गही बंद झाला आहे.