रत्नागिरी:- अमावास्येच्या दिवशी जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्याने जगबुडी, वाशिष्ठीसह अर्जुना, कोदवली या मोठ्या नद्यांचा पुर ओसरला आहे. त्यामुळे खेड, चिपळूण, राजापूरवर असलेले पुराचे संकट टळले. जिल्ह्यात सगळीकडे दिवसभरात श्रावणधारा कोसळत राहील्यामुळे गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाहेर पडणार्यांची पंचाईत झाली होती.
जिल्ह्यात मंगळवारी (ता. 18) सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या चोविस तासात सरासरी 47.76 मिमी पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस खेड तालुक्यात 80.4 मिमी झाला. मंडणगड 69.1 मिमी, दापोली 57 मिमी, खेड 80.4 मिमी, गुहागर 32.1मिमी, चिपळूण 44.3 मिमी, संगमेश्वर 38.2 मिमी, रत्नागिरी 23.9 मिमी, राजापूर 37 मिमी, लांजा 47.8 मिमी पाऊस झाला.
सोमवारी (ता. 17) खेड, चिपळूण, संगमेश्वर व राजापूर तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळतच होता. त्यामुळे पुर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. किनारी भागातील लोकांना प्रशासनाकडून सतर्कतेच्या सुचनाही दिलेल्या होत्या. पण रात्री पावसाचा जोर कमी झाल्याने खेडची जगबुडी, चिपळूणमधील वाशिष्ठी तर राजापूरमधील अर्जूना नदीची पाणी पातळी स्थिरावली. पुर ओसरल्यामुळे नागरिकांनीही निःश्वास साडेला. मंगळवारी दिवसभर संगमेश्वर तालुक्यात संततधार पाऊस सुरु होता; मात्र अन्य सर्वच तालुक्यात श्रावणसरी कोसळत होत्या. रत्नागिरी तालुक्यात सायंकाळी वेगवान वार्यासह पाऊस कोसळला.
चिपळूण शिरवली येथील श्रीमती कल्पना केशव कदम यांच्या घराचे पावसामुळे 20 हजार रुपयांचे नुकसान झाले. संगमेश्वर तालुक्यात कळुशी येथील चंद्रकांत पवार यांच्या घराचे पावसामुळे अंशत: 35 हजार रुपयांचे, कुरये तर्फे सावर्डा येथील सुरेश सोनू पडवे यांच्या घराचे 32 हजार रुपयांचे, राजापूर कोंडतिवरे येथील लक्ष्मण उमाजी गिते यांच्या घराचे पावसामुळे अंशत: नुकसान झाले. ओझर येथील शांताराम शाहू कोकरे यांच्या गोठ्याचे तर अणसुरे येथील अविनाश सोनू गावकर यांच्या गोठ्याचे पावसामुळे अंशत: नुकसान झाले.
दरम्यान, पावसाचा जोर ओसरल्यानंतर मंगळवारी मासेमारीला सुरवात झाली. समुद्र थोडा खवळलेला असला तरीही मच्छीमार धोका पत्करत होते. सकाळी रवाना झालेल्या बोटींना काहीप्रमाणात कोळंबी मिळत होती. वादळामुळे मासळी विशिष्ठ पॉकेटलाच आहेत. वादळ शांत झाल्यानंतर ती अन्यत्र पसरतील. त्यामुळे आज मच्छीमारांची निराशाच झाली. सध्या कोळंबीला 190 ते 210 रुपयापर्यंत दर मिळत आहे.