रत्नागिरी:- दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाला आरंभ झाला आहे. कडकडीत उन्हामुळे भातशेती संकटात सापडली होती; मात्र पावसाने बळीराजाला दिलासा दिला आहे.
गुरुवारी (ता. 4) सायंकाळपासून पावसाला आरंभ झाला. त्यानंतर शुक्रवारी दिवसभर पाऊस पडत होता. हवामान विभागाकडून जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. त्यानुसार पावसाला आरंभ झाला आहे. पावसाअभावी लावणी केलेली शेती कोरडी झाली होती. पावसाअभावी 30 टक्के म्हणजेच सुमारे 15 हजार हेक्टरवरील वरकस भातशेती संकटात आली होती. अजुन चार दिवस अशीच स्थिती राहीली असती तर अडचणीत वाढ झाली असती असे शेतकर्यांसह अभ्यासकांनीही सांगितले होते. पण शुक्रवारी दिवसभर पडलेल्या समाधानकारक पावसाने दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील 68 हजार हेक्टर भातशेती पैकी 55 हजार हेक्टरवरील लावण्यांची कामे पूर्ण झाली. पुढे सुमारे तेरा हजार हेक्टरवरील लावण्या पावसाअभावी रखडल्या होत्या. त्यांनाही आता चालना मिळणार आहे.
पावसाचा फटका मच्छीमारीला बसला आहे. 1 ऑगस्टपासून बंदी कालावधी संपुष्टात आल्यानंतर मच्छीमार समुद्रावर स्वार झाले होते; मात्र वेगवान वार्यामुळे समुद्र खवळल्याने अनेक मच्छीमारांनी सुरक्षेसाठी जवळच्या बंदरात आसरा घेतला आहे. हंगामाच्या सुरवातीलाच अडथळा निर्माण झाल्याने मच्छीमारांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. नारळीपौर्णिमेनंतरच खर्या अर्थाने नियमित मासेमारीला सुरवात होईल असे मच्छीमार श्रीदत्त भुते यांनी सांगितले.