रत्नागिरी:- पाली बाजारपेठेमध्ये पंचक्रोशीतील ग्राहकांची अत्यावश्यक सेवेतील वस्तु खरेदी करण्यासाठी गर्दी होत असते. त्यावेळी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध पाली पोलीस दुरक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनी दंडात्मक कारवाई केली. या अचानक झालेल्या कारवाईने विनाकारण फिरणाऱ्याना दणका बसत आहे.
पाली बाजारपेठ येथे काल(मंगळवारी) सकाळी अत्यावश्यक सेवेतील भाजी, किराणा, मटण, औषधे या वस्तुंच्या खरेदीसाठी ग्राहकांची थोडी गर्दी झाली होती. त्यावेळी काही जण विनामास्क फिरत असल्याने त्यांच्यातील ६ जणांवर कोरोना प्रतिबंधात्मक नियमांतर्गत कारवाई करत ३००० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. तर ४ जणांविरुद्ध विना मास्क सार्वजनिक ठिकाणी फिरल्या बद्दल गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच १०६ वाहन चालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे कारवाई करत तीस हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या कारवाईमुळे अनावश्यक फिरणाऱ्याना आळा बसत आहे तर काही जणांना याचा फटका बसत आहे. ही कारवाई रत्नागिरी ग्रामीण पोलीस निरीक्षक विनित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पाली पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस हेडकॉन्स्टेबल मोहन कांबळे, स्वाती राणे, पोलीस नाईक राकेश तटकरी यांनी केली.