पादचाऱ्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:- रस्त्याने चालत जाणार्‍या पादचार्‍याला ठोकून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी 9.30 वा.च्या सुमारास मारुती मंदिर परिसरात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हसनअली रहिम नेवरेकर (वय 84, रा. राजापूरकर कॉलनी) हे मारुती मंदिर नाट्यगृह इथून पायी चालत जात असताना त्यांना कोणत्यातरी अज्ञात वाहनचालकाने धडक दिली होती. यामध्ये हसनअली रस्त्यावर पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्या नाकातोंडातून रक्त वाहत होते. एका रिक्षाचालकाने त्यांना औषधोपचाराकरीता जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु येथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

हसनअली यांना ठोकर देणारे वाहन कोणते आहे? याचा अद्याप सुगावा लागलेला नाही. दरम्यान, ठोकर देऊन मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात भा.दं.वि.क. 304(अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.