रत्नागिरी:- ओमिओक्रॉनचा प्रादुर्भाव झालेल्या बाधित भारतात सापडल्यानंतर आरोग्य विभागाकडून सतर्कता बाळगली जात असून कोरोना लसीकरणावर अधिकाधिक भर दिला जात आहे. कोरोना बाधितांची संख्या कमी होऊ लागल्यामुळे दुसरा डोस घेण्यासाठी अनेकांकडून टाळाटाळ होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे 22 हजाराहून अधिक लाभार्थी दुसरा डोस घेण्यास पात्र असूनही लसीकरणासाठी पुढे आलेले नाहीत.
कोरोनाच्या दुसर्या लाटेचा जोर सप्टेंबर महिन्यात ओसरु लागला. सध्या जिल्ह्यात नव्या बाधितांची संख्या दहापेक्षा कमीच आहे. मृतांच्या प्रमाणावरही नियंत्रण आले आहे. गेल्या काही महिन्यात कोरोनावरील लसीकरणाला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 10 लाख 81 हजार एवढ्या लोकांनी लसीकरणाची पहिली मात्रा घेतली आहे. एकुण पात्र लोकांच्या तुलनेत 90.15 टक्के जणांनी पहिला डोस घेतला. राज्याच्या तुलनेत रत्नागिरी जिल्ह्यातील लसीकरणाचा टक्का अधिक आहे. दुसरा डोस घेणार्यांचा टक्काही 48.54 आहे. दुसर्या लाटेमध्ये कोरोना लसीकरणासाठी मोठ्याप्रमाणता गर्दी होत होती. ऑनलाईन नोंदणीही होत नव्हती. परंतु नोव्हेंबर, डिसेंबर या दोन महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे पहिला डोस घेणार्या 22 हजाराहून अधिक जणांनी कालावधी होऊनही दुसरा डोस घेतलेला नाही. कोव्हॅक्सीनसाठी 45 दिवसांनी तर कोव्हिशिल्डचा दुसरा डोस 87 दिवसांनी दिला जातो. सध्या 18 वर्षांखालील मुलांसाठीची लस आलेली नाही. जिल्ह्यात पात्र असलेल्यांपैकी 1 लाख 6 हजार 568 जणांनी पहिला डोसही घेतलेला नाही. त्यांचा शोध घेण्यासाठी आरोग्य विभागाला कडक धोरण अवलंबावे लागेल. तसेच दुसरी मात्रा घेण्यासाठी पात्र ठरुनही टाळाटाळ करणार्यांसाठी विशेष मोहिम प्रशासनाला घ्यावी लागणार आहे.