रत्नागिरी:- शहरासाठी सुरू असलेल्या सुधारित पाणी योजना सत्ताधार्यांना अडचणीची ठरत आहे. शहरांच्या रस्त्यांची खोदकामामुळे झालेली दुरवस्था, पाण्याची अनियमितता हे मुद्दे तोंडावर असलेल्या निवडणुकीत सेनेला मारक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे संथगतीने चाललेल्या पाणी योजनेला चालना देण्याचे प्रयत्न नगराध्यक्षांसह ना. सामंत करत आहेत. नुकतीच त्या अनुषंगाने महत्त्वाची बैठक घेऊन ठेकेदाराची चांगलीच कानउघाडणी केली. ठेकेदाराची 31 मार्चला मुदत संपत आली तरी तीन वर्षांमध्ये 55 ते 60 टक्केच योजनेचे काम झाले आहे.
शहराची सुधारित पाणी योजना सुरवातीपासूनच वादातीत ठरली. सेने-भाजपमध्ये श्रेयवाद उफाळून आला. त्यानंतर 54 कोटीच्या या पाणी योजनेचे फेरमूल्यांकन झाले. सुमारे 15.19 टक्के म्हणजे 8 कोटी दरवाढ केली. पाणी योजना 63 कोटींवर गेली. पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये वाढीव दराला मंजुरी देण्यासाठीचा ठराव तेव्हा घेण्यात आला. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि दोन अपक्ष या विरोधकांनी 308 खाली या ठरावाला स्थगिती मिळावी, म्हणून जिल्हाधिकार्यांकडे तक्रार केली. निकडीची गरज म्हणून जिल्हाधिकार्यांनी तो फेटाळला. आयुक्तांकडे हा विषय गेल्यानंतर त्यांनी स्थगिती दिली. 8 महिन्यांमध्ये भाववाढीमुळे मोठे नुकसान झाले. 8 कोटी रुपये नुकसान भरपाई मिळावी, असे पत्र ठेकेदार अन्वी कंपनीने पालिकेला दिले, असा योजनेचा इतिहास असून अजूनही 55 ते 60 टक्केच काम झाले. नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी मुख्य जलवाहिनीचे काम करून घेतले. त्याची चाचणी दोन दिवसात होणार आहे; मात्र शहरात अंतर्गत टाकण्यात येणार्या जलवाहिन्यांमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पाण्याची अनियमितता कायम आहे. नागरिकांमध्ये या मूलभूत समस्यांवरून प्रचंड रोष आहे. योजनेच्या ठेकेदाराला सर्व प्रकारे समजावून सांगूनदेखील त्याच्याकडून कामाला गती दिली जात नाही. याचा सर्व रोष सत्ताधार्यांवर येत आहे. त्यामुळे नुकतीच ठेकेदाराबरोबर महत्त्वाची बैठक घेण्यात आली. नगराध्यक्ष बंड्या साळवीसह सामंत कुटुंबीयांनी शहरातील समस्या तत्काळ सोडविण्यासाठी यात पुढाकार घेतला. ठेकेदाराला समज देऊन योजनेच्या काम गतीने करण्यास सांगितले. 31 मार्च 2021 ला ठेकेदाराला दिलेली मुदत संपत आली आहे. मुदतवाढ ही अनिवार्य असली तरी कामाला गती देण्यासाठी सेनेचा खटाटोप सुरू आहे.