पाणी योजनेच्या ठेकेदाराकडून पुन्हा एक कोटींच्या दरवाढीची मागणी

रत्नागिरी:- रत्नागिरीतील सुधारित पाणी योजना ठेकेदारासाठी कुरणच बनल्याची चित्र आहे. आधी योजना रखडल्याने दहा कोटी जादा घेणाऱ्या पाणी योजनेच्या ठेकेदाराने पुन्हा पानवल पासून येणारी पाइपलाइन टाकण्यासाठी एक कोटींचा जादा निधी देण्याची मागणी केली आहे. मात्र ही मागणी रनप प्रशासन मंजूर करणार की फेटाळून लावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

शहराची नळपाणी योजना कायमच वादात सापडली आहे. कधी ठेकेदाराला वाढीव पैसे देण्यावरून तर कधी नळपाणी योजनेच्या नियोजनशून्य बोगस कामावरून नेहमीच सुधारित नळपाणी योजना वाढतच राहिली आहे. ६३ कोटींची मूळ योजना हि दिवसागणिक कोट्यावधी रुपयांना वाढत असल्याचे चित्र आहे. मुळातच या नळपाणी योजनेचे काम बोगस झाले असून यामुळे वारंवार जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार घडत आहेत. मात्र अशा वेळी देखील ठेकेदार आपले हात वर करून या दुरुस्तीची जबाबदारी नगरपालिकेवर टाकत असल्याचे दिसत आहे.

फुटणाऱ्या जलवाहिनीमुळे नुकतेचे नव्याने केलेल्या रस्त्यांना देखील वारंवार खोदावे लागत आहे. शहराची विस्तारित पाणी योजना म्हणजे ठेकेदाराला सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ठरली आहे. 

६३ कोटींच्या या नळपाणी योजनेचे काम ठेकेदाराने वेळेत सुरु केले नाही. यानंतर आलेल्या कोरोनाच्या साथीमुळे हे काम देखील ठप्प होते. दोन वर्षात पूर्ण करण्याची योजना ४ वर्षे उलटली तरी अपूर्णच आहे. अद्याप या नळपाणी योजनेचे २० टक्के काम होणे बाकी आहे. यापूर्वी ठेकेदाराने पाईपचे दर वाढले म्हणून काम देखील अडवून ठेवले होते. हे अडवून ठेवलेले काम पुन्हा सुरु व्हावे म्हणून ठेकेदाराला १० कोटी रुपये वाढवून देखील देण्यात आले. आता पानवल धरणातून रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी टाकण्याचे काम देखील या ठेकेदारालाच करायचे आहे. मात्र पुन्हा एकदा दर वाढल्याचे करण देऊन या ठेकेदाराने जादा पैशाची मागणी केली आहे. आजवर ठेकेदाराचे सर्व हट्ट पुरवण्यात आले असून या ठेकेदाराला नेमका आशीर्वाद कोणाचा? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.