रत्नागिरी:- रत्नागिरीतील ऐतहासिक पतितपावन मंदिर सावरकर यांनी बांधल्याचा चुकीचा इतिहास पाठय़पुस्तक मंडळ महाराष्ट्र सरकारचे शिक्षण मंत्रालय विद्यार्थ्यांना शिकवत आहे. तर खरा इतिहास मिटविण्याचे षडयंत्र सरकारच्या माध्यमातून केले जात आहे. याबाबत यापूर्वी दिलेल्या निवेदनावर कोणतीही सुधारणा करण्यात आलेली नसल्याने तत्काळ कार्यवाही करण्यात यावी. या मागणीसाठी रविवार 26 जानेवारी 2025 रोजी रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघ व समविचारी संस्था यांचे मार्फत लाक्षणीक उपोषण करण्यात येणार आहे.
याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाला मंगळवारी देण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने इंग्रजी व मराठी माध्यमाया इयत्ता 8 वी च्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये पान क्र. 24 वर वि. दा. सावरकर यांनी पतितपावन मंदिर बांधले अशा स्वरुपाचा खोटा इतिहास पाठय़पुस्तकात समाविष्ट केला आहे. वास्तविक देशातील पहिले प्रतितपावन मंदिर दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी स्वखर्चाने बांधले आहे. तसा शिलालेख 1931 साली पतितपावन मंदिराच्या प्रवेशद्वारच्या कमानीवर आहे, त्याची छायांकीत प्रत देखील जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनासोबत जोडली आहे.
दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी स्वा. वीर सावरकर यांच्या विनंतीवरुन रत्नागिरीत स्वत जागा खरेदी केली होती. त्यावर स्वखर्चाने पतितपावन मंदिर बांधले आणि स्पृश्य अस्पृश्यांना एकत्र आणून सहभोजन घडविले. त्याकाळी भारतातील मोठ मोठी संस्थाने देखील अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश देवू शकली नव्हतीत. सन 1931 मध्ये पतितपावन मंदिराच्या उभारणीपासून दरवर्षी दिवाबत्ती व देखभाली करीता रुपये 1500/- भागोजीशेठ स्वत देत असत. पतितपावन मंदिर व मंदिरा शेजारील चाळ बांधण्यासाठी भागोजीशेठ कीर यांनी खाजगीतून केलेला खर्च 1933 सालच्या भागोजी बाळोजी कीर चॅरीटेबल ट्रस्टच्या ऑडिट रिपोर्टमध्ये दर्शविलेला आहे. असे असताना पतितपावन मंदिर सावरकर यांनी बांधल्याचा चुकीचा इतिहास पाठय़पुस्तक मंडळ महाराष्ट्र सरकारचे शिक्षण मंत्रालय विद्यार्थ्यांना शिकवत असून खरा इतिहास मिटविण्याचे षडयंत्र सरकारच्या माध्यमातून केले जात आहे.
या पुस्तकाचे प्रकाशक विवेक उत्तम गोसावी, पाठय़पुस्तक मंडळ प्रभादेवी, मुंबई 25 हे आहेत. याबाबतचे निवेदन दिनांक 30/11/2023 रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व तत्कालीन शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांना दिलेले आहे. तरी अद्यापपर्यंत कोणतीही सुधारणा करण्यात आलेली नाही. यावर तत्काळ कार्यवाही करण्यात यावी यासाठी रविवार 26 जानेवारी 2025 रोजी रलागिरी तालुका भंडारी समाज संघ व समविचारी संस्था यांचे मार्फत लाक्षणिक उपोषण करण्यात येणार राजीव यशवंत कीर, अध्यक्ष रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघ यांनी सांगितले आहे.