रत्नागिरी:-जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाच्या 3 मध्यम प्रकल्पांसह 65 लघु प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. यंदा चांगला पाऊस पडल्याने ही परिस्थिती आहे. त्यापैकी 44 धरणांमध्ये 100 टक्के पाणीसाठा आहे, तर 3 लघु प्रकल्पांमध्ये अल्पसाठा आहे. यातील 57 धरणे सुरक्षित असून 8 धरणे असुरक्षित असल्याचे पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे. भविष्यात धोका उद्भवू नये यासाठी अल्प पाणीसाठा केला जात आहे.
तिवरे येथील धरणफुटीच्या घटनेनंतर पाटबंधारे विभागाने धरणांच्या सुरक्षिततेला जास्त महत्त्व दिले आहे. त्या अनुषंगाने मध्यम व लघु प्रकल्पांबाबतचा अहवाल दर आठवड्याला प्रसिद्ध केला जातो. जिल्ह्यात 1 जूनपासून आजपर्यंत सरासरी 1243.77 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये चांगला पाणीसाठा झाला आहे. शेतीच्या कामांनाही सध्या वेग आला आहे. जिल्ह्यातील 65 पैकी 0 ते 25 टक्के भरलेली 5 धरणे, 25 ते 50 टक्क्यांमध्ये 4 धरणे, 50 ते 75 टक्क्यांमधील 4 धरणे, 75 ते 99 टक्क्यांतील 8 धरणे, तर 100 टक्के भरलेली 44 धरणे आहेत. मध्यम लघुपाटबंधारे प्रकल्पापैकी नातूवाडी 67.49 टक्के, गडनदी 100 टक्के, अर्जुना प्रकल्प शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील 57 धरणे सुरक्षित असून 8 धरणे असुरक्षित आहेत. खबरदारी म्हणून या धरणांमध्ये कमी पाणीसाठा ठेवण्यात आला आहे. चिंचाळे, बेर्डेवाडी, शेलारवाडी, राजेवाडी, तळवडे, जुवाठी आदी धरणांचा समावेश आहे. त्यामुळे या धरणांमध्ये कमी पाणीसाठा ठेवण्यात आला आहे.