रत्नागिरी:- जिल्ह्यातील धरणांची मान्सूनपूर्व तपासणी सुरु असून आत्ता सध्या एकही धरण धोकादायक नाही. जून 2022 पर्यंत अर्जुना व गडनदी प्रकल्प कालव्यांसहित पुर्ण होतील, अशी माहीती रत्नागिरी पाटबंधारे विभागाच्या अधिक्षक अभियंता वैशाली नारकर यांनी दिली.
जिल्ह्यात एकूण 61 धरणे आहेत. या धरणांची धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने मान्सूनपूर्व तपासणी मार्च महिन्यापासून सुरु झालेली आहे. गेल्या वर्षी काही धरण सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक कामे मंजूर करुन घेतली. साखरपा, पन्हाळे, आवाशी, भोळवली इत्यादी कामे मंजूर करुन त्यांची कामे सुरु झालीत. आत्ता सध्या एकही धरण धोकादायक नाही. मात्र सध्या लॉकडाऊन असल्यामूळे साहित्य, कामगार उपलब्ध होत नाहीत. ठेकेदारांना देखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे दुरुस्त्यांच्या संदर्भातील काही कामे करण्यास अडचणी येत आहेत. यावर्षी 20-25 वर्षे जुनी कालवे दुरुस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार आहेत. गवाणे कालव्याचे पाईपलाईनमध्ये रुपांतर, शिपोशी धरणाच्या कालव्याचे पाईपलाईनमध्ये रुपांतर करणे आदी कामे हाती घेणार आहोत. 2021-22 साठी बांधकामाधीन धरणांसाठी 343 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. जून 2022 पर्यंत अर्जुना मध्यम प्रकल्प व गडनदी प्रकल्प कालव्यासहीत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. जिल्ह्यातील हसोळ, ओझर, चिंचवाडी आदी धरणांच्या दुरुस्त्यांच्या कामांना सुप्रमा मिळालेली नाही. त्यामुळे या धरणांची कामे पूर्ण करता आलेली नाहित. शेलारवाडी, तळवट, काकेवाडी, पोयनार, चव्हाणवाडी यांचे प्रस्ताव पुणे एसएलटीसीकडे स्कुटीनी होऊन तपासणीच्या कार्यवाहित आहेत. त्यानंतर त्यांचे प्रस्ताव शासनाकडे सादर केले जातील.