रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात सहकार संस्थांची वाढ झाली. परंतु त्या तुलनेत संस्थांच्या लेखा परिक्षणील अ वर्ग संस्थांची मात्र घसरण झाली आहे. पाच वर्षांपूर्वी 2 हजार 888 सहकारी संस्था होत्या. पाच वर्षानंतर त्या संस्थांची संख्या 2 हजार 972 वर पोहोचली. पाच वर्षांपूर्वी 270 सहकारी संस्था अ वर्गात होत्या त्या आता केवळ 236 इतक्याच आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे लेखा परिक्षण होते. वेगवेगळ्या संस्थांचे लेखा परिक्षण करताना वेगवेगळ्या गुणपत्रकांची पडताळणी करावी लागते. जिल्हा विशेष लेखा परिक्षकांकडून (वर्ग 1) लेखा परिक्षण केले जाते. यामध्ये संस्थांची थकबाकी, ठेवी आदी चांगल्या प्रमाणात असतील तर अशा संस्थांना ‘अ’ वर्ग दिला जातो. ड वर्गातील संस्थांचा कारभार हा डबघाईस आलेला असतो. त्यामुळे अशा संस्थांना लेखा परिक्षणाचा ड वर्ग मिळतो. जवळ जवळ बंद स्थितीतच या ड वर्गातील संस्थांचा समावेश
होतो.
रत्नागिरी जिल्ह्यात सन 2022-23 च्या लेखा परिक्षणानुसार अ वर्गातील 236 संस्था आहेत, ब वर्गात ÷1 हजार 493 तर क वर्गात 207 सहकारी संस्थांचा समावेश झाला आहे. अ वर्गामध्ये मंडणगडतील 1, दापोली 28, खेड 19, चिपळूण 37, गुहागर 6, रत्नागिरी 115, संगमेश्वर 10, लांजा 12, राजापूरातील 8 सहकारी संस्थांचा समावेश आहे.
पाच वर्षांपूर्वी जिल्ह्यात 2 हजार 888 सहकारी संस्था होत्या. त्यामध्ये मंडणगडतील 4, दापोली 37, खेड 27, चिपळूण 28, गुहागर 10, रत्नागिरी 117, संगमेश्वर 23, लांजा 14 आणि राजापुरात 10 संस्था होत्या. त्यातील 270 संस्थाना लेखा परिक्षणात अ वर्ग दर्जा मिळाला होता. ब वर्गात 1 हजार 55, क वर्गात 552 तर ड वर्गात 26 संस्थांचा समावेश झाला होता. ज्या नवीन सहकारी संस्थांच्या स्थापनेला सहा महिने झालेले नाहीत अशा संस्थांचे लेखा परिक्षण होत नाही.