पाकिस्तानमधील धूळीच्या वादळाचा रत्नागिरीतील वातावरणावर परिणाम

रत्नागिरी:- पाकिस्तानकडून निघालेले धुळीचे वादळ चक्रकार वार्‍यामुळे गुजरात, अरबी समुद्रमार्गे महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहे. या वादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यात हलके धुळीच साम्राज्य पसरलेले होते. दृश्य मानताही कमीच होती तर सुर्य चंद्राप्रमाणेच शिथील दिसत होता. धुलीकणांमुळे आजारांची शक्यता वाढली आहे. धुळीचे हे वादळ सोमवारपर्यंत (ता. 24) संपूर्ण महाराष्ट्रात घोंगावत राहिल असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविला आहे.

कोकणात पाऊस तर मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात रविवारी (ता. 23) थंड वारे सुरु झाले आहेत. त्यामुळे उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात दृष्यमानता कमी झाली होती. धुलीकणांचे प्रमाण वाढल्यामुची नोंद हवामान विभागाकडे झाली आहे. पाकिस्तानातून आलेल्या या धुळीच्या वादळामुळे हवेत धुलीकण पसरले आहेत. त्यामुळे समोरचे दिसणे कमी झाले आहे. रविवारी सकाळी ढगाळ वातावरण होते. दहा वाजल्यानंतर सुर्य दर्शन झाले; मात्र दुपारी हवेत हळूहळू हलका धुलीकण दिसू लागले. त्यामुळे सूर्यही झाकोळला जाऊ लागला. रत्नागिरी शहरातील मांडवी, भाट्ये, काळबादेवी, आरे-वारे, गणपतीपुळेसारख्या किनारी भागात दाट धुळीचे साम्राज्य पसरलेले होते. हे वादळ मुंबईपासून धुळे, जळगावपर्यंत पोचले आहे. चक्राकार वार्‍यांमुळे धुळीचा प्रभाव सोमवारपर्यंत राहील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. हवेतील धुळीमुळे वाहन चालविताना चालकांना कसरत करावी लागत होती. याचा सर्वाधिक परिणाम घाटात होत होता. धुके, धुळ एकत्रित असल्यामुळे वाहन चालकांची परिक्षाच होती. दुषित हवेमुळे श्वसनाचे विकार, फुफ्पुसाचे रोग आणि अन्य आजार बळावतील. खराब हवामान हे जंतूच्या वाढीला पोषक असल्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेतली पाहीजे असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. वेगवान वार्‍यांमुळे दिवसभर थंडीही जाणवत होती.

अरे हा सुर्य कि चंद्र

रविवारी सुट्टी असल्यामुळे सायंकाळी रत्नागिरीकर फिरण्यासाठी मांडवी किनारी दाखल झाले होते; परंतु अस्तावेळी किनारी भागात दिसणारा लाल भडक सुर्य धुळीच्या कणांमुळे झाकोळला गेला होता. तेज कमी झाल्यामुळे तो पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे शिथिल दिसत होता. धुळीमुळे झाकोळलेला सुर्य पाहून हा चंद्र आहे की सुर्य अशी प्रतिक्रिया व्यक्त करत होतो. अनेकांच्या चेहर्‍यावर उत्सूकता होती.