रत्नागिरी:- मान्सून पुन्हा लांबण्याची भिती वर्तवण्यात आल्याने औद्योगिक विकास महामंडळाच्या धरणांवर अवलंबून असणाऱ्या ग्राहकांची चिंता वाढली आहे. एमआयडीसीच्या धरणामध्ये २० जूनपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आहे. त्यानंतर पाऊस लांबला तर पाणीपुरवठ्यामध्ये मोठी कपात करून तो दिवसाआड करावा लागणार असल्याचे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असली तरीही अजूनही सातत्य नाही. चक्रीवादळांमुळे पुन्हा मान्सून लांबणार असल्याचा अंदाज हवामानखात्याने वर्तवला आहे. उष्णतेमुळे अनेक धरणातील पाणीसाठ्यानेही तळ गाठला आहे. त्यामुळे जिल्ह्याला पाणीटंचाईची अजून गडद होण्याची शक्यता आहे. एमआयडीतील पाणी ग्राहकांवरही टंचाईची टांगती तलवार आहे. रत्नागिरी एमआयडीसीच्या हरचिरी धरणामधून तालुक्यातील ९ ग्रामपंचायती, मिरजोळे व उद्यमनगर औद्योगिक वसाहतील पाणीपुरवठा केला जातो. दरदिवशी त्यांच्यासाठी सुमारे १० एमएलडी पाणी धरणातून उचलून त्याचे वितरण केले जाते.
हरचिरी धरणांमध्ये आता २० जूनपर्यंत सुरळीत पाणीपुरवठा होईल एवढा पाणीसाठा आहे; परंतु त्यानंतरही पाऊस झाला नाही तर मात्र एमआयडीसीच्या ग्राहकांची चिंता वाढणार आहे. त्यानंतर पाणीकपात करून दिवसाआड ग्राहकांना पाणीपुरवठा करावा लागणार आहे. आतापर्यंत एमआयडीसीने चांगले पाणी नियोजन केल्यामुळे सुरळीत पाणीपुरवठा सुरू आहे; परंतु पाऊसच लांबल्याने एमआयडीसी व्यवस्थापनाचाही नाईलाज होणार आहे. एमआयडीसीचे हरचिरी धरण गाळाने भरले असून, त्याची पाणी साठवण पातळी कमी झाली आहे. त्यामुळे या धरणातील गाळ उपसणे अनिवार्य बनले आहे. त्यासाठी एमआयडीसीने महसूल विभागाकडे परवानगी मागितली आहे; परंतु ३ वर्ष महसूल विभागाकडे हा प्रस्ताव अद्याप धूळखात आहे.