रत्नागिरी:- 25 जानेवारी रोजी पांगरी येथे गाव पऱ्या खाली सापडलेल्या बालिका बेवारस प्रकरणाचा जिल्हाभर संताप व्यक्त होत आहे. मातेच्या या निंदनीय कृत्याने जिल्हा हादरला होता. आता या प्रकरणाचा छडा लागला असून बलिकेच्या मातेसह नराधमाला पोलिसांनी काल रत्नागिरी येथील कुवारबाव येथून ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी देवरुख पोलिसांनी ठिकठिकाणी पथक पाठवून या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला. 3 दिवसात या प्रकरणातील आरोपींना शोधण्यात देवरुख पोलिसांना यश आले. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, बेवारस बालकाच्या माता पित्याची ओळख पटवण्यासाठी प्रसिद्धी पत्रक तयार करून त्याची सोशल मीडिया तसेच वर्तमानपत्रातून प्रसिद्धी करण्यात आली होती. तसेच खबऱ्यांमार्फत गोपनीय माहिती मिळवण्यात आली. यावेळी रत्नागिरी येथे राहणाऱ्या तिच्या आईचा पत्ता लागला.
कुवारबाव बाजारपेठ येथे राहणाऱ्या तिच्या आईला पोलिसानी ताब्यात घेतले. सौ. सांची स्वरूप कांबळे (पूर्वाश्रमीची शितल श्रीपत माईंगडे वय २६, सध्या राहणार कुवारबाव, बाजारपेठ ता. जि रत्नागिरी) असे तिचे नाव आहे. तर तिला मदत करणारा मिथिल उर्फ मिथिलेश मदन डांगे (वय २३, रा. हातखंबा, डांगेवाडी ता. जि. रत्नागिरी) यालाही ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे या प्रकरणाच्या अनुषंगाने तपास करण्यात आला असता त्यांनी त्या बालिकेला २४ जानेवारी रोजी रात्री ११.३० वा. दरम्याने पांगरी गाव पऱ्यामधे टाकल्याचे कबूल केलेले आहे. त्यावरून त्यांना गुन्ह्याचे कामी अटक करण्यात आलेली आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग, रत्नागिरी, श्रीम. जयश्री देसाई, मा. अप्पर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी, श्री. निवास साळोखे, मा. उपविभागीय पोलिस अधिकारी, लांजा, पोलीस निरीक्षक, श्री. बी. एस. जाधव व पोलिस निरीक्षक, श्री. यु. जे. झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक विद्या पाटील, व्ही. डी. मावळंकर, एस. एस. भुजबळराव, एस. एस. सडकर, जे. जे तडवी, पोना के. एम. जोयशी, पोना एस. डी. जाधव, पोशि आर. आर. कांबळे, पोशी डी. एम. मांढरे या पथकाने आरोपी यांचा शोध घेऊन चांगली कामगिरी पार पाडली आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक करण्यात येत आहे.