रत्नागिरी:- शासनाच्या सुचनेनुसार 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचे कोविड लसीकरणाला सुुरुवात झाली. पहिल्या दिवशी 19 केंद्रांवर 1 हजार 774 मुलांना लस देण्यात आली. सर्वाधिक लस संगमेश्वरात दिली गेली.
रत्नागिरी शहरातील कोकणनगर येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण मोहीमेचा आरंभ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्ह्यामध्ये ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण आठवड्यातून दोन वारी म्हणजेच बुधवार व शनिवारी घेण्यात येणार आहे. लसीकरणासाठी केवळ कोव्हॅक्सिन लसीचाच वापर करण्यात येणार आहे. याचे नियोजन कार्यक्षेत्रातील शाळा व महाविद्यालये येथे केल्यास लसीकरणाला गती मिळण्यास मदत होईल, असे प्रतिपादन डॉ. आठल्ये यांनी यावेळी केले. याप्रसंगी डॉ. एम. एम. सुर्यवंशी डॉ. परिमल, डॉ. सुधीर सु. दुसाने आदी उपस्थित होते. लसीकरणाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी बी. एन. पाटिल, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, उपाध्यक्ष उदय बने यांनी केले आहे.