पश्चिम महाराष्ट्राशी जोडल्या जाणाऱ्या आंबा घाटाच्या दुरुस्तीला पुन्हा प्रारंभ  

रत्नागिरी:- पश्चिम महाराष्ट्राशी रत्नागिरीला जोडणार्‍या आंबा घाटाच्या दुरुस्तीला बुधवारपासून सुरुवात झाली आहे.  पावसाचा जोर ओसरल्याने जवळपास दोन महिन्यानंतर आता डागडुजीचे काम वेगाने सुरु झाले आहे. आंबा घाटात बारा ठिकाणी डोंगर घसरले असून त्यातील तीन ठिकाणे धोकादायक आहेत.  यातील एक ठिकाण अतिधोकादायक आहे. या भागाचा अभ्यास करुन काम करण्यासाठी मुंबईतील एका संस्थेची निवड करण्यात आली असून यासाठी साडेचार कोटीचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. दिल्लीतील अधिकार्‍यांनी आंबा घाटाची पाहणी करुन अधिकार्‍यांना मार्गदर्शन केले आहे. 

कोकणात निर्माण झालेल्या महापुराच्या परिस्थितीवेळीच कोसळलेल्या धुवाँधार पावसाचा फटका 22 जुलै रोजी रत्नागिरी व कोल्हापूरला जोडणार्‍या आंबा घाटालाही बसला. तब्बल 12 ठिकाणी डोंगर खाली आले तर काही ठिकाणी रस्त्याला भेगा पडून तो खचल्याच्या घटना घडल्या. यामुळे आंबा घाट पंधरा दिवस बंद ठेवण्यात आला होता. रस्त्यावर आलेली दरड हटवण्याचेच काम पंधरा दिवस सुरु होते. तातडीची किरकोळ दुरुस्ती करुन हा घाट छोट्या वाहनांसाठी सध्या सुरु ठेवण्यात आला.

तीन ठिकाणी भाग खचले असून एक भाग अतिधोकायदायक असल्याची नोंद राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे करण्यात आली आहे. त्यापैकी एका ठिकाणी रस्त्याची एक बाजू पूर्ण खचली असून तो अधिक धोकादायक आहे. खचलेल्या अर्धा रस्त्यामध्ये कठडा बांधून डोंगराच्या बाजूला गटारावर स्लॅब टाकून रस्ता वाढवण्यात आला आहे. तर एका ठिकाणी डोंगर घसरून तो रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला शेतात गेला आहे. तो भाग पुन्हा कधीही खचण्याची शक्यता आहे. दोन डोंगरांना जोडणार्‍या दरीच्या ठिकाणीही गतवर्षी रस्ता खचला होता व त्यानंतर त्याची तात्पूरती डागडूजी करण्यात आली होती. त्याठिकाणीही रस्त्याचा भाग खचत आहे.

दोन ठिकाणी एका बाजूने रस्ता पूर्ण खचला आहे. तेथे तळातून रेटलींग वॉल बांधण्यात येणार आहे.रस्त्याच्या या कामासाठी साडेचार कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांना बुधवारपासून आंबा घाटात सुरुवात झाली आहे. त्यासाठी अत्याधूनिक मशिनरी मंगळवारी सायंकाळी घाटात दाखल झाली होती. धोकादायक भागाचे काम करणार्‍या कंपनीचे अधिकारीही दाखल झाले होते.
गेले दीड-दोन महिने पावसाचे प्रमाण अधिक असल्याने हे काम सुरु करण्यात आले नव्हते. सध्या पावसाचे प्रमाण कमी झाल्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. पुढील दीड महिना या धोकादायक भागाच्या दुरुस्तीचे काम चालणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग विभाग दिल्लीच्या अधिकार्‍यांनी मंगळवारी आंबा घाटाची पाहणी केली. यावेळी स्थानिक अधिकार्‍यांना सूचना केल्या. इलेक्ट्रिक केबल टाकण्याबाबतही मार्गदर्शन केले.
रत्नागिरी-सिंधुदुर्गंचे खासदार विनायक राऊत हे गुरुवार 30 सप्टेंबर रोजी आंबा घाटाची पाहणी करणार आहेत. या वेळी ते सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकार्‍यांकडून कामाच्या स्थितीचा आढावा घेणार आहेत. आंबा घाटातील बंद असलेली अवजड वाहतूक व मिर्‍या-नागपूर भूसंपादन या विषयावर खा. राऊत हे वाहतूकदार व अधिकार्‍यांशी चर्चा करणार आहेत.