रत्नागिरी:- पावसाळी मासेमारी बंदीनंतरची पर्ससीन नेट मासेमारी सुरू होवून तीन दिवस झाले तरी अद्याप 50 ते 60 टक्के नौकाच मासेमारीसाठी समुद्रात जात आहेत. नौका मालकांची आर्थिक स्थिती ढासळलेली असल्याने अनेकांना आगावू रकमा देवून खलाशी आणणे शक्य झालेले नाही. मासेमारीसाठी समुद्रात जाण्यापूर्वी जी देखभाल दुरूस्ती करावी लागते ती करणारी कारागिर मंडळी मिरकरवाडा बंदर सोडून दुसर्या जिल्ह्यातील बंदरांवर कामांसाठी गेल्याने अनेक नौकांच्या देखभाल दुरूस्तीची कामे रखडली आहेत. त्यामुळे या नौकाही मासेमारीसाठी जावू शकलेल्या नाहीत.
पावसाळी मासेमारी बंदीनंतर पर्ससीन नेट मासेमारी 1 ऑगस्टपासून सुरू झाली. तीन दिवस झाले तरी रत्नागिरीतील सर्व पर्ससीन नौका मासेमारीसाठी जावू शकल्या नाहीत. ज्या नौका मासेमारीसाठी जात आहेत त्यातील 5 ते 10 टक्के नौकानाच बांगड्याचा चांगला रिपोर्ट मिळत आहे. त्यामुळे मासेमारीसाठी जाणार्या बहुसंख्य नौकाना अपेक्षित मासळी मिळत नसल्याचे मच्छिमार नेते जावेद होडेकर यांनी सांगितले.
पर्ससीन नेट नौकांची मासेमारी सुरू होण्यापूर्वी विविध प्रकारची तयारी करून घ्यावी लागते. यामध्ये परप्रांतीय खलाशांना आगावू रकमा देवून आणावे लागते. मागील मासेमारी हंगाम बहुसंख्य मच्छिमारांसाठी तोट्याचा गेला. त्यामुळे खलाशांना आणणे ज्या नौका मालकांना शक्य झालेले नाही त्यांच्या नौका समुद्रात मासेमारीसाठी जावू शकलेल्या नाहीत.
रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरात नौकांच्या देखभाल दुरूस्तीची कामे करणारे कारागिर येथे पुरेसे काम नसल्याने जिल्ह्याबाहेरच्या बंदरांवर कामे मिळतील या आशेने गेले आहेत. यामध्ये जाळी विणणे, जाळी शिवणे, नौकांच्या फळ्या बदलणे, इंजिन दुरूस्त करणे आदी कामांचा समावेश आहे. परंतु ही दुरूस्तीची कामे करणारे कारागिर जिल्ह्याबाहेर गेल्याने अनेक नौकांची दुरूस्ती झालेली नाही. या नौकासुद्धा मिरकरवाडा बंदरातच उभ्या आहेत. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी मासेमारीचा हंगाम सुरू झाल्याचे दिसून येत नाही.
दरवर्षी सप्टेंबरच्या पहिल्या तारखेला पर्ससीन नेट मासेमारी सुरू होते तेव्हा वारा, पाऊस असतो. या वातावरणामुळे दूरवरच्या खोल समुद्रातील मासा किनार्याच्या जवळपास येतो. त्यामुळे काही प्रमाणात मासळी जाळ्यात सापडते. परंतु यावर्षी पर्ससीन नेट मासेमारी सुरू होवून तीन दिवस झाले तरी वारा, पाऊस नसल्याने अपेक्षित मासळी मिळू लागली नसल्याचे सांगण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 280 पर्ससीन नेट नौका आहेत. यातील 50 ते 60 टक्के नौका समुद्रात जावू लागल्या आहेत. यातील केवळ 5 ते 10 टक्के नौकानाच बांगडा मासा बर्यापैकी प्रमाणात मिळत आहे. त्यामुळे मासे मिळण्याचा हंगाम आणखी पंधरा दिवसांनी पुढे जाण्याची शक्यता आहे.