पर्ससीन मच्छीमारांवर अन्याय झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन

 पर्ससीन मच्छीमारांचा पत्रकार परिषदेत इशारा 

रत्नागिरी:- राजकीय नेत्यांनी आम्हाला संपवण्याचा विडाच उचलला आहे. आधी शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबवा मग मासेमारीवर वक्तव्य करा, असा सल्ला देत पारंपारिक मच्छिमारांचे आंदोलन ही एक नौटंकीच आहे. पर्ससीन मच्छिमारांवर अन्याय झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा मच्छिमार नेते नासीर वाघू यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

जिल्ह्यात पारंपारिक विरूद्ध पर्ससीन असा वाद पुन्हा निर्माण झाला आहे. या वादात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून गुरूवारी पर्ससीननेटधारक मच्छिमारांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी पर्ससीन मच्छिमारांचे सल्लागार ऍड. मिलिंद पिलणकर, राष्ट्रवादीचे नेते बशीर मुर्तुझा, रत्नागिरी तालुका पर्ससीन असो. चे अध्यक्ष विकास उर्फ धाडस सावंत, उपाध्यक्ष विजय खेडेकर, प्रतिक मोंडकर यांच्यासह पर्ससीन मासेमारी करणारे मच्छिमार यावेळी उपस्थित होते.

या पत्रकार परिषदेत मच्छिमार नेते नासीर वाघू यांनी राजकीय नेत्यांवर टिकेची तोफ डागली. आम्हाला संपविण्याचा डाव राजकीय नेत्यांनी आखला आहे. पर्ससीनवर बोलणार्‍या आ. सदाभाऊ खोत व आ. बच्चू कडू यांनी आधी शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबविण्याकडे लक्ष द्यावे व त्यानंतरच पर्ससीनवर भाष्य करावे, असा सल्ला वाघू यांनी यावेळी दिला.