पर्ससीन, एलईडीद्वारे मासेमारी करणाऱ्यांवर कडक कारवाई करा: अस्लम शेख

रत्नागिरी:- अवैध मासेमारी करणाऱ्यांविरुद्ध शासनाने कडक भूमिका घेतली आहे. यापुढे पर्ससीन नेट, एलईडीद्वारे मासेमारी करणाऱ्याविरुद्ध कडक कारवाईचे आदेश मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिला आहे. तर कोकण किनारपट्टीवर तीन लँडिंग पॉईंट उभारणार आहोत, अशी माहिती मंत्री अस्लम शेख यांनी दिली. तसेच समुद्र किनाऱ्यावरील गाळ काढण्यासाठी विशेष तरतूद करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

दापोली, मंडणगड, गुहागर मच्छिमार संघर्ष समितीने मत्स्यव्यवसाय, बंदरे विकास मंत्री अस्लम शेख यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यावेळी त्यांनी संबधितांवर कारवाईचे आश्वासन दिले. दापोली, मंडणगड, गुहागार मच्छिमार संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने अस्लम शेख यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी दापोली-मंडणगडचे आमदार योगेश कदम, मत्स्य व्यवसाय विकास आयुक्त अतुल पाटणे यांच्यासह शिष्टमंडळातील बाळकृष्ण पावसे, प्रकाश रघुवीर, गोपीचंद चौगले, विष्णू ताबीब, सोमनाथ पावसे, गणेश घोगले, हरेश्वर कुलाबकर, यशवंत खोपटकर आदी उपस्थित होते.