रत्नागिरी:- खोल समुद्रात पाण्याला प्रचंड करंट असल्यामुळे मच्छीमारांच्या वेळापत्रकावर परिणाम होत आहे. व्यावसाय सुरु ठेवण्यासाठी आटापिटा करुन मासेमारीसाठी जाणार्यांना थोडी फार मासळी मिळत आहे. पर्ससिननेटला गेदर तर ट्रॉलिंगवाल्यांच्या जाळ्यात पापलेट आणि म्हाकुळ मिळतोय. फिशिंगच्या बोटींना सरंगा मिळू लागला आहे. वादळामुळे गेल्या आठवड्यात थांबलेल्या फिशिंगच्या बोटींना सरंग्याचा आधार मिळाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
हवामान विभागाने 22 सप्टेंबरपर्यंत वेगवान वार्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार किनारी भागात वारे वाहत असून समुद्र खवळलेला आहे. नौका पाण्यात उभ्या करुन मासेमारी करणे अशक्य आहे. शनिवारी मिरकरवाडा, साखरतर, काळबादेवी येथील काही फिशिंगवाल्या नौकांना 30 ते 40 किलो संरगा मिळाला. हा पापलेटचा प्रकार असून तो चविष्ट असतो. मिरकरवाडा जेटीवर सरंग्यासाठी अनेक खवय्यांनी धाव घेतली. 170 रुपयांपासून 430 रुपये किलो दर मिळाला. सुपर सरंग्याला अधिक दर मिळत असून तो निर्यातीसाठी पाठवला जातो. हा मासा 15 ते 20 वावात मिळत असल्याचे मच्छीमारांनी सांगितले. त्याबरोबरच फिशिंगला बला मासा मिळत आहे. 70 ते 80 किलो बला मिळत असून तो प्रक्रिया कंपनीला साधारणपणे 70 रुपये किलोने विकला जातो.
फिशिंगवाल्यांबरोबरच पर्ससिनेटलाही बर्यापैकी मासळी मिळत आहे. सध्या 20 ते 40 डिश (एक डिश 32 किलो) गेदर मिळत आहे. किलोला 1500 ते 1800 रुपये दर मिळत असल्याने वादळामुळे निर्माण झालेली पोकळी भरुन काढण्यासाठी मच्छीमारांना आधार मिळत आहे. त्याचबरोबर ट्रॉलिंगद्वारे मासेमारी करणार्यांना पापलेट, म्हाकुळ मिळत आहे. त्यात 5 ते 10 किलो पापलेट असून म्हाकुळी बर्यापैकी आहे. पापलेटला किलोचा दर 500 ते 1000 रुपयांपर्यंत आहे. गेल्या पंधरा दिवसांमध्ये सतत वातावरणात बदल होत आहे. त्याचा परिणाम मासेमारीवर होतो. खोल समुद्रात अचानक परिस्थिती बदलली तर सुरक्षेसाठी मच्छीमारांना जवळच्या बंदरांचा आधार घ्यावा लागत आहे.