राज्यातील खलाशांसाठी स्थानिक मच्छीमारांकडून प्रयत्न
रत्नागिरी:- पर्ससिननेट मासेमारी 1 सप्टेंबरपासून सुरु होणार असल्याने त्याची तयारी सुरु झाली आहे. बहूतांश नौकांवर कर्नाटकमधील खलांशी असतात. त्यांना आणण्यासाठी ईपास तयार करावा लागणार आहे; मात्र कोरोनामुळे पालघर, ठाण्यातील शेकडो खलाशी गुजरातकडे जाण्याऐवजी रत्नागिरीकडे वळण्याची शक्यता आहे. कर्नाटक, नेपाळपेक्षा राज्यातून खलाशी मिळाले तर बरे या उद्देशाने स्थानिक मच्छीमारांकडून प्रयत्न सुरु झालेले आहेत.
शासनाच्या निर्देशानुसार 1 ऑगस्टपासून ट्रॉलिंगसह गिलनेटद्वारे मासेमारीला सुरवात झाली. या नौकांवर खलाशीची जास्त आवशक्यता लागत नाही. ट्रॉलिंगवर जास्तीत जास्त सहा ते सात खलाशी असतात. गिलनेटला त्याहून कमी खलाशी असतात; मात्र पर्ससिननेट नौकांवर 25 ते 30 खलाशी गरजेचे असतात. रत्नागिरी जिल्ह्यातील पर्ससिननेट नौकांवर येणारे खलाशी हे कर्नाटक, नेपाळ येथील असतात. स्थानिक खलाशांचे प्रमाण अत्यल्प आहे.
1 सप्टेंबरपासून पर्ससिननेट मासेमारी सुरु होत आहे. त्यापुर्वी खलाशांना आणण्यासाठी मच्छीमारांचे प्रयत्न सुरु झालेले आहेत. कोरोनामुळे सध्याच्या मासेमारीवर मोठे संकट निर्माण झालेले आहे. परराज्यातूनच नव्हे तर राज्यांतर्गत प्रवास करतानाही ईपास आवश्यक आहे. अन्य राज्यातून खलाशी आणण्यासाठी पास काढणे, खलाशांना क्वारंटाईन करुन ठेवणे या गोष्टी कराव्या लागणार आहेत. त्यादृष्टीने मच्छीमारांकडून पावले उचलली जात आहेत. एकवेळ कर्नाटकमधील खलाशी येतीलही, पण नेपाळी लोकांना इकडे येत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामध्येही काही मच्छीमारांकडून अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यात एक चांगला पर्याय शोधला आहे. पालघर, ठाणे येथील अनेकजणं गुजरातमध्ये खलाशी म्हणून काम करतात. कोरोनाच्या परिस्थितीमुळे ते परराज्यात जाण्याऐवजी रत्नागिरीकडे वळण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने काही मच्छीमारांनी त्यांच्याकडे विचारणा सुरु केली आहे. त्यांची तपासणी करुन इकडे आणणे येथील मच्छीमारांना शक्य आहे. कर्नाटकमधून आणताना दोन्ही राज्याची परवानगी घ्यावी लागणार आहे. यामधून किचकट प्रक्रिया करावी लागणार नसल्याचे काहींचे मत आहे.
वादळामुळे मच्छीमारी ठप्प शनिवारपासून वादळी वार्यांसह पडणार्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सलग दोन दिवस मच्छीमारी पूर्णतः ठप्प झाली आहे. गुहागर पाठोपाठ दापोली केळशी येथे नौका उलटून अपघात झाल्यामुळे मच्छीमारांनी धसका घेतला आहे. गेल्या काही दिवसात टायनी, पापलेट, कोळंबी बर्यापैकी सापडत होती. मिळालेली मासळी स्थानिक बाजारातच चांगल्या दराने विकली जात आहे. पापलेटला वजनानुसार 170 ते 1050 रुपयांपर्यंत दर मिळत आहे. समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी आवरते घेतले असून सर्वच नौका किनार्यावर आहेत.