जिल्हाधिकार्यांचे आवाहन; माहितीचा व्हिडीओ प्रसिध्द
रत्नागिरी:- कोरोनातील टाळेबंदीनंतर रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन पूर्ववत आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत. अनेकजण देशी निसर्ग पर्यटनस्थळे बाजूला ठेवून परदेशात जात होते; त्यांनी कोकणातील निसर्ग सौदर्याचा आस्वाद घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.
रत्नागिरीतील पर्यटनस्थळांची माहिती देणारा व्हीडीओही प्रसिध्द करण्यात आला आहे.
मार्च महिन्यात कोरोनाने पाय पसरले आणि सर्वच व्यवहार थंड पडले. पर्यटनाचा हंगामच कोरोनात सापडला. त्यानंतर पावसाळा, गणेशोत्सव आणि दिवाळीची सुट्टीही वाया गेली. मंदिर बंद असल्यामुळे अनेकांनी घरातच राहणे पसंत केले. भारताबरोबरच अन्य देशातील परिस्थितीही गंभीर आहे. भारतामधून परदेशात फिरण्यासाठी जाणार्यांची संख्या काही कोटीत आहे. कोरोनाचे सावट हळूहळू सरत असून पर्यटकही बाहेर पडण्यासाठी धडपडत आहेत; परंतु फिरण्यासाठी जायचे कुठे हा प्रश्न अनेकांपुढे आहे. कोरोनामुळे बहूतांश पर्यटक हे सुरक्षिततेवर भर देत आहेत. निसर्गरम्य अशा ठिकाणी सुरक्षिततेची हमी असेल तर त्या ठिकाणी पर्यटकांचा कल राहू शकतो. हीच बाब रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने हेरली आहे. दापोलीतील किनारे, गणपतीपुळे, पावस, विविध मंदिरे, गुहागरचा शांत किनारा या ठिकाणी निसर्गाचा आस्वाद घेत फिरण्यासाठी अनेक पर्यटक येऊ शकतात. जिल्ह्याच्या किनारी दिसणारे डॉल्फिन पर्यटकांचे आकर्षण ठरु शकतात. परदेशात आवर्जुन पर्यटन करणार्या आपल्याकडे खेचण्यासाठी आकर्षक असा व्हिडीओ जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये पर्यटनस्थळांची माहिती, निवासाची व्यवस्था याची माहिती दिली गेली आहे.
बहूतांश ठिकाणी कोरोनाच्या भितीने ऑनलाईन कामकाज सुरु आहे. दिवाळी पाडव्यानंतर गणपतीपुळे, दापोलीसह विविध पर्यटनस्थळांवरील पर्यटकांचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे. गणपतीपुळे दिवसाला पाच हजाराहून अधिक लोक येऊन जात आहेत. ही गर्दी ख्रिसमसमध्ये आणखीन वाढेल अशी शक्यता आहे. यामध्ये श्रीमंत वर्गाचा भरणा अधिक राहणार आहे. गेल्या काही दिवसात जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांना अच्छे दिन आले आहेत. भविष्यातही हीच परिस्थिती राहील अशी आशा व्यक्त केली जात आहे.